कळंबस्ते मुस्लीम मोहल्ला येथील चोरी नसून चोरीचा बनाव

0

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मुस्लीम मोहल्ला येथील एका घरातून लाखो रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांच्या तपासाअंती हा चोरीचा बनाव असल्याचे उघड झाले आहे. चोरीला गेलेले दागिने सदर महिलेच्या सूनेने बँकेत गहाण ठेवल्याची बाब समोर आल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी दिली आहे.  कळंबस्ते येथील बिल्कीश कमाल बोट (वय ५८ रा. कळंबस्ते) या आपल्या दोन सुनांसह कळंबस्ते मुस्लिम मोहल्ला येथे राहतात. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवून त्या झोपी गेल्या होत्या. हिच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून पेटीत ठेवलेले ३ तोळ्याचे ७५ हजार किंमतीचे मंगळसूत्र, २ तोळयांचा ५० हजार किंमतीचा सोन्याचा हार व १ तोळ्याचे १२ हजार ५०० रूपये किंमतीचे लेडीज ब्रेसलेट असे सोन्याचे दागिने लांबविले असल्याची फिर्याद बिल्कीश यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी संगमेश्वर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यावेळी पोलिसांनी बिल्कीश यांच्या घरातील मंडळींची कसून चौकशी केली. पोलीसी खाक्या दाखवताच बिल्कीश यांची सून विनाज बोट हिने आपणच हे दागिने संगमेश्वर मधील बँकेत गहाण ठेवल्याचे कबूल केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली…पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार विनाज बोट हिने रत्नागिरी येथील एका ओळखीच्या माणसाकडून १ लाख रूपये व्याजी स्वरूपात घेतले होते. मात्र या रकमेवरील व्याज दिवसागणिक वाढत गेल्याने घेतलेले पैसे फेडायचे कसे? हा त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला होता. यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली व घरातील १ लाख ३७ हजार ५०० रूपये किमतीचे सोन्याचे दागिने बँकेमध्ये गहाण ठेवले होते ही बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. यावरून ही चोरी नसून चोरीचा बनाव झाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान पोलिसांनी विनाज बोट हिच्या विरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. वाय. नेवरेकर करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here