रत्नागिरी शहरात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांची आता खैर नाही

0

◼️ कचरा फेकणाऱ्यांवर राहणार ‘सीसीटीव्ही’चा वॉच

रत्नागिरी : रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी रत्नागिरी पालिकेकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची सोय केली आहे; मात्र काहीजण गाडी गेल्यानंतर मोकळ्या जागेवर कचरा फेकतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शहरात १२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्य बाजारपेठेसह परिसरामध्ये छोटी-मोठी दुकानेही आहेत. मारुती मंदिरसह पुढील भागात लोकवस्ती वाढत असल्याने तेथेही नवीन बाजारपेठा भरतात. वाढत्या वस्तीमुळे दररोज शहरात काही टन कचरा गोळा केला जातो. तो साचून शहर बकाल होऊ नये, यासाठी पालिकेने घंटागाडी सुरू केली आहे. प्रत्येक वसाहतीमधून कचरा गोळा करून तो घंटागाडीत दिला जातो. बाजारपेठांमधील व्यावसायिकांसाठी रात्रीची गाडी सुरू केली आहे. अशी व्यवस्था केली, तरी अनेक नागरिकांकडून कचरा मोकळ्या जागेत टाकला जातो. तेथे भटकी कुत्री, भटकी जनावरे वास्तव्य करतात. अन्न मिळत असल्यामुळे ती मोकाटपणे शहरभर फिरतात. त्यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी आणि शहरात स्वच्छता राखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कडक पावले उचलली जात आहेत. घंटागाडी निघून गेल्यानंतर मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यासाठी शहरातील १२ जागा निश्चित केल्या आहेत. त्या अशा – पऱ्याची आळी, पटवर्धन हायस्कूलकडे जाणाऱ्या गल्लीत छाया लॉजसमोर, झारणी रोड, आठवडा बाजार शौचालयामागे, मिरकरवाडा पोलीस चौकी, नवीन भाजी मार्केट, कोकणनगर स्वामी समर्थ बंगल्यासमोर, मजगाव रोडवरील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामागील भाजी मार्केटसमोर, कोकणनगर कदमवाडीसमोर, मारुती मंदिर मच्छीमार्केटमध्ये, झारणी रोड मच्छीमार्केट. तेथे कॅमेरे लावण्यासाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात ठेकेदार निश्चित करून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:56 AM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here