रत्नागिरी : हंगामाच्या सुरूवातीपासूनच खराब हवामानाच्या कचाट्यात सापडलेल्या मासेमारी हंगाम पुरता अडचणीत सापडला आहे. अस्थिर वातावरणामुळे बोटींना रिपोर्ट मिळत नसल्याने अनेक नौका बंदरात उभ्या आहेत. काम नसल्याने अनेक बोटींवरील खलाशी निघून घेल्याने बोट मालक हवालदिल झाले आहेत. सद्यस्थितीत केवळ गेदर किंवा कोकेरीवर समाधान मानावे लागत आहे. मोठ्या मुश्किलीने सुरमई किंवा पापलेट हाताला लागत आहे. रिपोर्ट नसल्याने मासळीचे दर गगनाला भिडले असून ही स्थिती आणखी काही दिवस राहण्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर या दोन्ही महिन्यात मच्छीमारांना वादळ, वाऱ्यांचा सामना करावा लागला. दोन महिन्यात बहुतांश वेळा मासेमारी बंद ठेवावी लागली होती. पाण्याला असलेल्या करंटमुळे जाळी एकमेकाला चिकटून नौकेच्या पंख्यात अडकण्याची सर्वाधिक भीती अनेक वेळा निर्माण होत होती. मासेमारीचे ऑगस्टमधील वीस तर सप्टेंबरमधील बहूतांश दिवस वायाच गेले. मागील काही दिवस मासेमारीची आश्वासक सुरूवात झाली परंतु, पुन्हा समुद्रातील वातावरण अस्थिर झाले. वेगवान वाऱ्यामुळे फिशिंगच्या नौका बंदरातच आहेत. मासेमारीसाठी रवाना झालेल्या नौकांना एक ते दोन टन गेदर किंवा कोकेर मासा मिळत आहे. त्यात एखादा टप खवले, वाशी ही मासळी मिळते. एकूण नौकांच्या तुलनेत चार ते पाच टक्के नौकांनाच मासळी मिळते अशी स्थिती आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा आणि भगवतीबंदर तसेच जयगड, काळबादेवी, पावस यासह जिल्ह्यातील प्रमुख बंदरांवर मासेमारीचखे हिच स्थिती आहे. मोठी मासळी अचानक गायब झाल्याने मच्छिमार पुरते हवालदिल झाले आहेत. सर्वाधिक नुकसान पर्ससिन मच्छिमारांचे झाले आहे. आधीच पर्ससिन हंगामाल मोजून चार महिने त्याच एक महिना असाच संपल्याने उर्वरित तीन महिन्यात व्यवसाय करायचा तरी कसा या विवंचनेत मच्छिमार आहेत. हंगामाच्या सुरूवातीलाच मच्छिमारांना बांगडा, सुरमई हे मासे मोठ्या प्रमाणावर मिळत होते. मात्र बिघडलेल्या वातावरणाचा फटका उत्पादनावरदेखील झाला आहे. अशातच वारवार वातावरणात बदल होत असल्याने याचा सर्वाधिक फटका मच्छिमारांना सहन करावा लागत आहे. मासेमारी बंद असल्याने मासळीची आवक घटली आहे. प्रमुख माशांचे दर तर गगनाला भिडले आहेत. यामध्ये पापलेट ७०० रूपये किलो, सुरमई ६०० ते ८०० रूपये किलो, बांगडादेखील २५० रूपये किलो, चिंगळ ४०० रूपये किलो, सौंदळा मासा ३०० रूपये किलोवर पोहचला आहे. मासळीचे दर वाढल्याने रविवार असूनही मासळी बाजारात शुकशुकाट होता.
