वादळग्रस्त प्रत्येक मच्छिमाराला मिळणार नुकसान भरपाई; शासन निर्णय जारी

0

रत्नागिरी : क्यार आणि महा चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या 65 कोटी 17 लाख 20 हजाराच्या पॅकेजमधील प्रति कुटुंब, एकच लाभ ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना मत्स्य पॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे.

सागरी मच्छीमारांना 2019-2020 च्या मासेमारी हंगामात वादळी हवामानामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी मासेमारी न करता परत यावे लागले. त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नास मुकावे लागले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार व महा चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे आर्थिक कंबरडेच मोडले. या सर्व गोष्टींचा विचार करुन शासनाने ऑगस्ट 2020 ला मत्स्य पॅकेजची घोषणा केली; परंतू या पॅकेजमधील काही निकष, अटी व शर्तीमुळे मच्छीमारांना या पॅकेजचे लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. लोकप्रतिनिधी, मच्छीमार सहकारी संस्था, पारंपारिक मच्छीमार यांनी या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी लावून धरली होती. कुटुंबातील केवळ एकाच पात्र लाभार्थास पॅकेजचे लाभ मिळण्याची तरतुद जुन्या शासन निर्णयाप्रमाणे होती. त्यामुळे भाऊ-भाऊ किंवा एकाच कुटुंबातील महिला मच्छी विक्रीचे व्यावसाय करत असले तर त्याचा लाभ त्यांना मिळाला नसता. ही संख्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत मत्स्य विभागाकडे अनेकांच्या तक्रारीही गेल्या होत्या. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे हा विषय गेल्यानंतर विचारविनिमय करुन ही अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकाच कुटुंबातील स्वतंत्र मासेमारी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यास व मच्छिमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधीस नव्या निकषांप्रमाणे स्वतंत्र लाभाची तरतुद करण्यात आली आहे. परंतू पात्र लाभार्थी एकापेक्षा जास्त मच्छीमार संस्थांचा सभासद असल्यास त्याला कोणत्याही एकाच संस्थेतून, एकाच घटकाखाली पॅकेजचा लाभ मिळू शकेल. तसेच बहुतांश मच्छिमारांची खाती ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत खातं असण्याची अट देखील शिथिल केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 16-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here