‘मातोश्री’च्या अंगणात शिवसेनेची बंडखोरी कायम; तृप्ती सावंत यांनी दबाव झुगारला

0

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बंडखोरी शमविण्यात शिवसेना-भाजपाला काही प्रमाणात यश आलं असलं तरी अद्यापही काही जागांवर बंडखोरी कायम असल्याने त्याचा फटका शिवसेना-भाजपाला होण्याची शक्यता आहे. अशातच दस्तरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी मागे घेण्याचा दबाव झुगारुन लढण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज भरत युतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. तृप्ती सावंत यांनी माघार घ्यावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न अयशस्वी ठरले. तृप्ती सावंत या निष्ठावंत शिवसैनिक बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. बाळा सावंत वांद्र पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात तत्कालीन काँग्रेसचे नेते नारायण राणे निवडणूक लढवित होते. मात्र सहानभुतीच्या जोरावर तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला. मात्र आता तृप्ती सावंत यांना निवडणुकीत तिकीट देण्याबाबत शिवसेनेने अनुकुलता दाखविली नाही. त्यांच्या जागेवर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देऊन तृप्ती सावंत यांनी उमेदवारी नाकारण्यात आली. दिवंगत आमदार बाळा सावंत यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असून, शिवसेनेने विधानसभेतील एकमेव महिला आमदाराला तिकीट नाकारून सावंत यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सावंत यांनी 2015 च्या पोटनिवडणुकीत पराभव केला होता, याकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त करण्यात आली. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here