मुंबई : विधानसभेच्या रणांगणासाठी अंतिम लढतींचे आज चित्र स्पष्ट झाले. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरांना शांत करण्यात महायुतीसह आघाडीलाही यश आले. मात्र, अनेक बंडाची निशाणी कायम असल्याने राज्यात बऱ्याच ठिकाणी बहुरंगी लढती निश्चित झाल्या आहेत. अर्थपूर्ण तसेच राजकीय घडामोडींनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस गाजला. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांची माघारही चर्चेचा विषय ठरली. पुणे : शहरातील भाजपा-शिवसेना महायुती व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख बंडखोर उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीचे आपले अर्ज मागे घेत तलवारी म्यान केल्या आहेत. पर्वती मतदारसंघातून काँग्रेसचे आबा बागुल, कन्टोन्मेंटमधून सदानंद शेट्टी, कसब्यातून कमल व्यवहारे, वडगावशेरी मतदार संघातून शिवसेनेचे संजय भोसले, खडकवासल्यातून रमेश कोंडे आदी प्रमुख उमेदवारांनी माघार घेतली आहे. शिवाजीनगर मतदार संघातून मात्र एकाही उमेदवारांनी माघार घेतली नसून त्याठिकाणी १३ उमेदवार रिंगणात आहेत. ठाणे : जिल्ह्यातील ३७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मोहोळ : वैध ठरलेल्या २२ उमेदवारां पैकी ८ उमेदवारांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याचे निश्चित झाले आहे. हिंगोली : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील 54 उमेदवारांपैकी 21 उमेदवारांनी माघार घेतली असून 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पंढरपूर : २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी मुख्य लढत तिरंगी होणार असल्याचे दिसते. शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी माघार घेतली तर काँग्रेसच्या शिवाजी काळूनगे यांचा उमेदवारी अर्ज राहिला आहे. मात्र, त्यांची उमेदवारी फारसी प्रभावी ठरणार नसल्याचे मानले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके, भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक आणि अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यांच्यातच निवडणूक रंगणार आहे. कडेगाव-पलूस : विधानसभा मतदारसंघात एकूण 21 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. यापैकी अर्ज छानणीत विविध कारणास्तव सात अर्ज अवैध ठरवण्यात आले, तर १४ अर्ज वैध ठरले होते. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले. यामुळे कडेगाव-पलूस मतदारसंघातून नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर ठाकले आहेत. येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ : निवडणुकीच्या रिंगणात ८ उमेदवार राहिले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्यासह ६ जणांची माघार झाल्याने आता येथे दुरंगी लढत होईल.मात्र वंचित आघाडीचे सचिन अलगट, महेंद्र पगारे यांची उमेदवारी दोन प्रमुख उमेदवारांना त्रासदायक होऊ शकेल अशी स्थिती दिसतेय. इस्लामपूर : अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केलेली बंडखोरी कायम राहीली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ही बंडखोरी थोपविण्यात यश आले नाही. त्यामुळे येथील निवडणूक तीरंगी- चौरंगी होणार आहे. आता विधानसभेच्या मैदानात ७ उमेदवार राहिले आहेत. सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून (क्र. २४९) राष्ट्रवादीचे उमेदवार जुबेर बागवान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये आघाडीत बिघाडी होणार का या प्रश्नावर पडदा पडला आहे.
