शिवसेना विरुद्ध राणे अधिक भाजप

0

सिंधदुर्गनगरी : खा. नारायण राणे यांचा पाठिंबा असलेले भाजपचे बंडखोर उमेदवार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज सावंतवाडीत कायम ठेवला असून राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रणजित देसाई कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात शिवसेनेविरोधात उतरले आहेत. कणकवलीत तर खासदार राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हेच भाजपचे उमेदवार असून त्यांच्या विरोधात सतीश सावंत यांच्या रूपाने शिवसेनेने आपला अधिकृत उमेदवार कायम ठेवला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध राणे अधिक भाजप अशीच लढाई सुरू झाली आहे.तीन मतदारसंघात 23 उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे सावंतवाडीतील उमेदवार बबन साळगावकर हे रिंगणात उतरल्यामुळे त्या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. युती होऊनही शिवसेनेने तीनही मतदारसंघांत अधिकृत उमेदवार दिले आहेत. त्यातील सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर आणि कुडाळमधील शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक हे सुरुवातीपासूनच युतीचे अधिकृत उमेदवार मानले जात होते. राजन तेली हे सावंतवाडीतून बंडखोरी करणार हे सर्वश्रुत होते. मात्र, ऐनवेळी त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडू असा दावा भाजपच्या नेतेमंडळींकडून केला जात होता; परंतु कणकवलीतून ठरल्याप्रमाणे शिवसेनेने सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी देऊन रिंगणात उतरवल्यामुळे कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघांत भाजप व स्वाभिमान पक्षाने जाहीररीत्या एकत्र येत उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अर्थात, राजन तेली व रणजित देसाई या भाजप आणि स्वाभिमान पुरस्कृत उमेदवारांना निशाणी मात्र अपक्षाचीच घ्यावी लागली आहे. कारण भाजपकडून या दोन्ही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले नव्हते.  भाजपचे उमेदवार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असल्याचे भाजपच्या नेत्यांनी जाहीर केले होते. परंतु सोमवारी शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांनी सतीश सावंत हेच महायुतीचे उमेदवार आहेत, असा दावा करून या लढतीमध्ये रंग भरला आहे. एवढेच नव्हे तर कणकवलीतून भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना पाठिंबा दिला आहेच, त्याशिवाय सतीश सावंत हे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यामुळे आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून सतीश सावंत यांचा प्रचार करणार असे म्हटले आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन मतदारसंघातून छाननीअंती आणि नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर 23 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, अशी  माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड उपस्थित होते. कणकवली मतदारसंघातून 7 उमेदवार : यात नितेश नारायण राणे (भाजपा), राजन शंकर दाभोळकर (मनसे), विजय सूर्यकांत साळकर (बसपा), सतीश जगन्नाथ सावंत (शिवसेना), सुशील अमृतराव राणे (राष्ट्रीय काँग्रेस), अ‍ॅड.मनाली संदीप वंजारे (वंचित आघाडी) आणि वसंतराव भाऊसाहेब भोसले (बहुजन मुक्ती पार्टी). कुडाळ मतदारसंघातून 7 उमेदवार यामध्ये अरविंद नामदेव मोंडकर (राष्ट्रीय काँग्रेस), रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बसपा), धीरज विश्वनाथ परब (मनसे), वैभव विजय नाईक (शिवसेना),  बाळकृष्ण विठ्ठल जाधव (अपक्ष),   रणजित दत्तात्रय देसाई (अपक्ष) आणि सिद्धेश संजय पाटकर (अपक्ष), सावंतवाडी मतदारसंघातून 9 उमेदवार :दीपक वसंतराव केसरकर (शिवसेना), प्रकाश गोपाळ रेडकर (मनसे), सुधाकर शांताराम माणगावकर (बसपा), प्रेमानंद लक्ष्मण साळगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस), दादू उर्फ राजू गणेश कदम (बहुजन मुक्ती पार्टी), यशवंत वसंत पेडणेकर (बहुजन महा पार्टी), सत्यवान उत्तम जाधव (वंचित बहुजन आघाडी), राजन कृष्णा तेली (अपक्ष) आणि  अजिंक्य धोंडू गावडे (अपक्ष).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here