कणकवली : शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांचे कट्टर समर्थक असलेल्या स्वाभिमान पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खा. विनायक राऊत यांनी मागच्या निवडणुकीत आ. वैभव नाईक यांनी इतिहास घडवला तसाच इतिहास कणकवली मतदारसंघात सतीश सावंत घडवतील असा विश्वास व्यक्त केला. येथील लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात हा शिवसेना पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजप नेते संदेश पारकर, बाळा भिसे, महिला जिल्हाप्रमुख निलम सावंत-पालव, रूची राऊत, तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, शैलेश भोगले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंब्रडचे आबा मुंज, रामदास विखाळे, महेंद्र डिचोलकर, नागवे सरपंच नारायण आर्डेकर, भिरवंडे सरपंच देवेंद्र सावंत, हरकुळ बुद्रुकचे माजी सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर, करंजेचे माजी सरपंच संतोष परब, हरकुळ खुर्दचे अविनाश रासम, दामू सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य अशा शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक आणि शिवसेना पदाधिकार्यांनी स्वागत केले. मंगळवारी शिवसेनेच्या दसर्या मेळाव्यात सतीश सावंत हे उपस्थित राहणार असून विजयाचा पुष्पगुच्छ ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देतील अशी माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली. यावेळी आ. वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील तीनही जागा मोठ्या मताधिक्क्याने शिवसेना जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते आदींची भाषणे झाली.
