आघाडी आणि महायुतीतील बंडोबांचा बंदोबस्त अखेर झालाच

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 32 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी आठजणांनी आपले अर्ज मागे घेतले. जिल्ह्यातील दापोली या मतदारसंघात सर्वाधिक 11 उमेदवार रिंगणात असून चिपळूण मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. आघाडी आणि महायुतीतील बंडोबांचा बंदोबस्त करण्यात दोन्हीकडे यश आले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र मागे न घेतल्याने, रत्नागिरीत सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मात्र, खरी लढत ही शिवसेना आमदार उदय सामंत व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक असलेले सुदेश मयेकर यांच्यातच रंगणार आहे. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या दोन व मनसेच्या एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने आता 7 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. भाजपचे प्रसाद पाटोळे व संतोष गांगण यांच्यासह मनसेकडून डमी उमेदवारी अर्ज दाखल करणारे मंदार राणे यांनी आपले अर्ज मागे घेतले. येथे महायुतीचे आ. राजन साळवी आणि आघाडीचे अविनाश लाड यांच्या लढत होणार 
आहे. मंडणगड- दापोली- खेड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 14 उमेदवारांपैकी 3 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघासाठी आता 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या केदार साठे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मंडणगड- दापोली- खेड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या दापोलीचे तालुक्याचे अनंत मोहिते, मंडणगडचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मीरकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आघाडीच्या आ. संजय कदम यांच्या मार्गातील बंडोबांचे अडथळे दूर झाले आहेत. येथे महायुतीचे योगेश कदम आणि आघाडीचे आ. संजय कदम यांच्यात लढत होणार आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार खेतल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मुख्य लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे.या निवडणुकीसाठी चिपळूणमधून पाच उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले होते. त्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रफुल्लचंद्र पवार व भाजपचा एबी फॉर्म न दिल्याने तुषार खेतल यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. त्यामुळे चार उमेदवार रिंगणात होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना व भाजपमध्ये दिलजमाई झाल्याने खेतल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आता तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सेनेतर्फे सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीकडून शेखर निकम तर बसपाचे सचिन मोहिते निवडणूक लढविणार आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातून पाच उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या रामदास राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे रिंगणात राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर, महायुतीचे भास्कर जाधव, बसपाचे उदय पवार, मनसेचे गणेश कदम, वंचितचे विकास जाधव यांच्या लढत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here