देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माभळे काष्टेवाडी येथील एका तरूणाने गोठ्यामध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम भागोजी गीते (वय ४९ वर्षे, रा. माभळे काष्टेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ संजय गीते यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. तुकाराम गीते हे नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ९.३० वा. जेवून झोपी गेले. सोमवारी पहाटे घरातील मंडळी उठली असता, तुकाराम त्यांच्या निदर्शनास आले नाहीत. आजुबाजुला पाहणी केली असता, घरा जवळ असलेल्या गोठ्यामध्ये गळफास लावलेल्या स्थितीत तुकाराम दिसून आले. हे दृष्य पाहताच घरच्या मंडळींनी एकच हंबरडा फोडला. याबाबतची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस निरीक्षक उदय झावरे, दिनकर विभुते, सुभाष नेवरेकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तुकाराम यांना संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय सुत्रांनी तपासणी करून यांना मृत घोषीत केले. याच ठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईक च्या तव्यात देण्यात आला. गीते यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुलं, भाऊ, भावजय असा परिवार आहे. गीते यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही..
