मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बंडखोर व अपक्षांनी सादर केलेले बहुतांश अर्ज मागे घेतल्यामुळे उद्या, 8 ऑक्टोबरपासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत दौर्यावर जाणार आहेत; तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 9 ऑक्टोबर रोजी पुण्यात नातूबाग येथील सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानात सभा आयोजित केली आहे. 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर तर दुसर्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पवारांचा दौरा असेल. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता, पारोळा येथे सायंकाळी 5 वाजता, 9 ऑक्टोबर रोजी विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी 11 वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा – कारंजा दुपारी 4 वाजता, 10 ऑक्टोबर रोजी हिंगणघाट सकाळी 10 वाजता, बुटीबोरी – हिंगणा 3 वाजता, काटोल 5 वाजता इत्यादी ठिकाणी पवार जाहीर सभा घेणार आहेत. मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत हालचाल दिसत नव्हती. अखेरीस मनसैनिकांच्या आग्रहामुळे राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. मनसेने राज्यभरात 110 उमेदवार जाहीर केले. परंतु सभांसाठी मैदाने आरक्षित केले नाहीत. पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस महाआघाडी व मित्र पक्षांनी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. राज यांची 9 ऑक्टोबर रोजी पुण्यात सभा होणार आहे. तर ठाण्यात 19 ऑक्टोबर रोजी मनसेच्या प्रचाराची शेवटची सभा आयोजित करण्यात आली आहे.
