जि.प. च्या स्थायी समितीत उदय बनेंचा संताप; अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करत केला सभात्याग

0

रत्नागिरी : कोरोना रुग्ण, शिमगोत्सावासाठी आरोग्य विभागाकडून केलेली कार्यवाही यासह लसीकरणासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यालयात करावयाची व्यवस्था या विषयांसह विविध प्रश्‍नांवर स्थायी समितीमध्ये अधिकारी उडवाउडवाची उत्तरे देत होते. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ सदस्य उदय बने यांनी अधिकार्‍यांचा निषेध व्यक्त करत सभात्याग केला. त्यानंतर प्रभारी अध्यक्ष महेश नाटेकर यांनी अधिकार्‍यांना कडक सुचना देत स्थायी समिती तहकुब केली.

महेश नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. कोरोनाची आढावा बैठक असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड या जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. तशी माहिती अध्यक्षांना दिली होती. आरोग्य विभागाचे अधिकारी अनुपस्थिती असले तरीही त्यांचे प्रतिनिधी होते. स्थायी समितीच्या अजेंड्यावरील विषयांवर चर्चा सुरु होती. सुमारे दीड तास ही बैठक चालली. रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील बसस्थानकाच्या प्रश्‍नासंदर्भात बने यांनी झालेल्या कार्यवाहीवर प्रश्‍न उपस्थित केला. पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनीही संबंधित विषय मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या होत्या; परंतु तो प्रश्‍न जैसे थेच ठेवण्यात आला. याबाबत प्रशासनाकडून उडवा उडवीची उत्तरे दिली गेली. त्यावरुन उदय बने चांगलेच संतापले होते. शिमगोत्सवाला चाकरमानी येणार आहेत. कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्‍वभुमीवर आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती बने यांच्यासह सदस्यांनी मागितली. लसीकरणाच्या स्थितीसह जिल्हा परिषदेत येणार्‍या लोकांसाठी केंद्र सुरु करण्याबाबत अधिकार्‍यांना विचारणा केली. उपस्थित असलेल्या आरोग्य अधिकार्‍यांना याची माहिती देता आली नाही. त्यावरुन बने चांगलेच संतापले. अधिकारीच योग्य उत्तरे देत नसतील, सभाशास्त्राप्रमाणे सभा चालवली जाणार नसेल, अधिकारी उपस्थित राहणार नसतील तर उपयोग काय असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यांचा अवतार पाहिल्यानंतर अध्यक्षांसह सदस्य आणि अधिकार्‍यांची पाचावर धारण होऊन बसली. अध्यक्ष नाटेकर यांनी हा विषय सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र बने यांनी अधिकार्‍यांचा निषेध व्यक्त करत तणतणत सभागृहाबाहेर पडणे पसंत केले. त्यानंतर नाटेकर यांनी अधिकार्‍यांची कानउघडणी करत सभागृहाचे कामकाज पध्दतीने करावे अशा सुचना दिल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:23 PM 19-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here