चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार तुषार खेतल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मुख्य लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे. या निवडणुकीसाठी चिपळूणमधून पाच उमेदवारांनी ११ अर्ज दाखल केले होते. त्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रफुल्लचंद्र पवार व भाजपचा एबी फॉर्म न दिल्याने तुषार खेतल यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. त्यामुळे चार उमेदवार रिंगणात होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (सोमवारी) शिवसेना व भाजपमध्ये दिलजमाई झाल्याने खेतल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे आता तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सेनेतर्फे सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीकडून शेखर निकम तर बसपाचे सचिन मोहिते निवडणूक लढविणार आहेत. आता या मतदारसंघात प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असून मुख्य लढत चव्हाण विरुद्ध निकम यांच्यातच रंगणार आहे. त्यामुळे चुरशीचा सामना होणार आहे.
