रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांची झाडलोट करून रत्नागिरी नगर परिषदेचा आरोग्य विभाग स्वच्छता अभियानात अग्रेसर असल्याचा आभास निर्माण करत आहे. परंतु नगर परिषदेच्या मालकीच्या गल्लीबोळातील रस्ते झाडण्यासाठी आठ ते दहा दिवस सफाई कामगार येतच नाहीत. त्यामुळे शहरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. आता तर निवडणूक आचारसंहिता लागल्याने सर्वपक्षीय नगरसेवक आणि पदाधिकारी प्रचार कार्यात गुंतल्याने नियंत्रण ठेवण्यास कोणीही नसल्याने सफाई कामगारांचे फावले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत रत्नागिरी नगर परिषदेला सलग दोन वर्षे पारितोषिके जाहीर झाली. पारितोषिकातील अडीच कोटी रुपयेसुद्धा मिळाले आहेत. परंतु शहरातील अंतर्गत गल्लीबोळांमधील रस्त्यांवरील कचरा स्वच्छतेची पोलखोल करत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनाही अशा अंतर्गत अस्वच्छतेकडे लक्ष ठेवणे आणि तेथील स्वच्छता करून घेणे कठीण झाले आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी स्वच्छतेसाठी मोबाईलवर संपर्क साधणाऱ्यांचे फोनही उचलत नाहीत. विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेतील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक आपापल्या उमेदवारांच्या प्रचारकार्यात गुंतले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या प्रभागातील रत्नागिरी नगर परिषदेची मालकी असलेल्या गल्लीबोळांमधील अस्वच्छतेच्या तक्रारींचा निपटारा करणे जिकिरीचे झाले आहे.शहरातील एखाद्याने कचरा काढला गेला नसल्याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करायची म्हटली तर ते अनोळखी नंबरने आलेला कॉल उचलला जात नाही. शहरातील अशा अंतर्गत रस्त्यांवरील कचरा आठ-आठ, दहा-दहा दिवस काढला जात नाही. त्यामुळे अशा अस्वच्छतेच्या ठिकाणी राहणाऱ्या शहरवासीयांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या अंतर्गत अस्वच्छतेमुळे स्वच्छता अभियानाचीच ऐशीतैशी होत आहे… एका बाजूला किनाऱ्यांची स्वच्छता केली जात आहे, मात्र दुसऱ्या बाजूला शहरात व शहरानजीकच्या खेडशी, कुवारबाव, कारवांची वाडी परिसरातही मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यानजीकच कचरा टाकला जात आहे.
