रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी खेड आणि चिपळूण शहरात शिरल्याने या दोन्ही शहरातील जनजीवन ठप्प झाले आहे. पाणी वाढल्याने या नद्यांवर असणाऱ्या पुलांवरील वाहतूक बंद केल्याने मुंबई-गोवा महामार्ग अजूनही बंदच आहे. काल रात्रीपासूनच या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. नद्यांना आलेला पूर व त्यातच समुद्राला असणारी भरतीची वेळ यामुळे या पाण्याची पातळी वाढल्याचे बोलले जात आहे. गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाउस सुरु आहे. शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला. चिपळूणमध्ये मध्यरात्रीपासून बाजारपेठेत पाण्याची पातळी वाढू लागली. पहाटे चार वाजता बाजारपेठेत पाणीचपाणी झाले होते. खेर्डी येथेही रस्त्यावर पाणी असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. चिपळूणप्रमाणेच खेड येथेही बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. खेडमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासूनच जगबुडीने धोक्याची पातळी गाठली होती. शहराच्या बाजारपेठेत रात्रीच पाणी शिरू लागले. पावसाचा जोर कायम राहिल्याने पहाटेच्या सुमारास बाजारपेठ पाण्याखाली गेली
