धुंदरेतील डम्पिंग ग्राऊंड रद्द न केल्यास आंदोलन

0

लांजा : स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असताना नगर पंचायतीकडून शहरालगतच्या धुंदरे येथे डम्पिंग ग्राऊंडची जागा मनमानीपणे लादण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, ही जागा त्वरित रद्द न केल्यास येथील नागरिक तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत. वेळप्रसंगी प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष व येथील स्थानिक नगरसेवक रवींद्र कांबळे यांनी दिली आहे. या बाबत रवींद्र कांबळे यांनी सांगितले की,लांजा नगर पंचायतीच्या वतीने धुंदरे भागातील साखरे यांची जागा नगर पंचायतीच्या नियोजित डम्पिंग ग्राऊंडसाठी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, ही जागा भर लोकवस्ती जवळ तसेच नदी किनारी आहे. त्यामुळे या डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीसह अन्य सर्व प्रकारचा त्रास स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागणार आहे. तसेच ही जागा बेनी नदीकिनारी आहे. या नदीचे पाणी लांजा शहरासह देवधे, झापडे व देवराई या गावांना नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुरविले जाते. पावसाळ्यात ही सगळी शहरातील घाण नदीमध्ये जाण्याची शक्यता आहे. पाणी झिरपून आजुबाजूच्या विहिरीत देखील जाण्याची भीती आहे. यामुळे पाणी दूषित होऊन रोगराई पसरण्याची शक्यता आहे. साथीचे वेगवेगळे आजार फैलावण्याची देखील भीती आहे. येथील स्थानिक जनता या जागेला कडवा विरोध करीत आहे. याबाबत जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन विरोध देखील दर्शविला आहे. मात्र तरी देखील नगर पंचायत प्रशासन हिच जागा कायम करुन स्थानिक नागरिकांच्या मागणीचा आणि भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नगर पंचायतच्या या मनमानी कारभाराविषयी जनतेच्या मनात चीड निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी नगर पंचायतीला स्थानिक जनता यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असताना नगरपंचायत हे आदेश धाब्यावर बसविताना दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले असताना व स्थानिक जनतेचा विरोध असताना तसेच स्थानिक नगरसेवक रवींद्र कांबळे यांनी सुरुवातीपासूनच विरोध करीत असताना देखील याच जागेसाठी नगर पंचायत हट्ट का करीत आहे, नेमके यामागे काय गौडबंगाल आहे, असे संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. डम्पिंग ग्राऊंडची जागा त्वरीत रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक लोकांमधून दिला गेला आहे. वेळ पडल्यास याविरोधात न्यायालयीन लढाई देखील लढण्याचा इशारा, स्थानिक लोकांच्यावतीने नगरसेवक रवींद्र कांबळे यांनी दिला आहे.

IMG-20220514-WA0009LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here