बेळगाव : साईराज स्पोर्टस् क्लब व साईराज डेव्हलपर्स आयोजित पहिल्या साईराज चषक अखिल भारतीय निमत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेत शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम सामन्यात मराठा स्पोर्टस् आयकर विभाग मुंबईने शिवाजी तरुण मंडळ कोल्हापूरचा पेनल्टी शूटआऊटवर 5-4 असा पराभव करून साईराज चषकावर नाव कोरले. लेले मैदानावर झालेल्या या सामन्यात अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्याने हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. दोन्ही संघांना निर्धारित वेळेत गोल नोंदवता आला नाही. विजेत्या संघाला स्पर्धा पुरस्कर्ते महेश फगरे, गजानन फगरे, राहुल फगरे, संजय कडोलकर, अमर सरदेसाई, अमित पाटील, जॅकी मस्करेन्हास, शीतल वेसणे आदींच्या हस्ते साईराज चषक आणि 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. उपविजेत्या शिवाजी तरुण मंडळाच्या संघाला चषक आणि 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून लिनेकर मेंचाडो (मुंबई), उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून आदिल अन्सारी (मुंबई), उत्कृष्ट स्ट्रायकर म्हणून ओला (कोल्हापूर) याला गौरवण्यात आले. ‘गोल्डन बूट’चा मानकरी राहुल गुरव (दर्शन युनायटेड) ठरला. शिस्तबद्ध संघ म्हणून दर्शन युनायटेडला गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद चव्हाण, विजय रेडेकर, ओमकार आजगावकर, महांतेश असगर यांनी परिश्रम घेतले.
