महालक्ष्मी एक्स्प्रेस पाण्यात

0

बदलापूर : वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान जामटोली येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस पाण्याखाली गेली आहे. पहाटे तीन वाजल्यापासून ही गाडी याठिकाणी थांबल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेमध्ये ७०० प्रवासी असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. एनडीआरएफ, बदलापूर नगरपरिषद, अंबरनाथ नगरपरिषद अंबरनाथ एमआयडीसी यांच्यासह स्थानिक पोलिस तसेच स्थानिक नागरिकांकडून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एनडीआरएफच्या ८ बोटी बचावकार्यासाठी रेल्वेजवळ पोहोचल्या आहेत. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी इंडिया रेफिने बोटी पाण्यात उतरवल्या आहेत. रेल्वे रुळांच्या चारही बाजूला पाणी असल्याने व उल्हास नदीची पाणीपातळी वाढल्याने ही ट्रेन जवळपास दरवाजापर्यंत बुडाली आहे, मात्र प्रवासी सुखरूप आहेत. इंडिया रेफिने बचावकार्याचा वेग घेतला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात हेलिकॉप्टर पाठवणार असल्याची घोषणा केली आहे.पावसाचा जोर कायम राहिल्यास या ठिकाणी मदतकार्याचा वेग वाढवावा लागेल. मात्र या गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिकांकडे कोणतेही साधन नसल्याने व पुराच्या पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. स्थानिक नागरिकांनी या ट्रेनमध्ये असलेल्या लोकांसाठी खाण्यापिण्याची सोय केली आहे. गेल्या चोवीस तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. बदलापूरला पुराचा वेढा पडला आहे. बदलापूर पश्चिम येथील हेंद्रे पाडा मांजर्लि, रमेश वाडी बॅरेज रोड आदी परिसरातील तळमजल्यावरील घरे पाण्याखाली गेली आहेत. उल्हास नदीने आपली पातळी ओलांडल्याने बदलापूर शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला आहे. कुळगाव बदलापूर नगरपरिषद आणि स्थानिक नागरिक आणि राजकीय पदाधिकारी व नगरसेवकांनीकडून याबाबत बचावकार्य सुरू आहे. मात्र प्रशासन या ठिकाणी पूर्णपणे कोलमडल्याचे दिसत आहे. अनेक भागात वाहनेही जाऊ शकत नसल्याने या लोकांना मदत मिळत नाही. पहाटे सहावाजल्यापासून पावसाचा जोर ओसरला असला तरी कर्जत आणि रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची धोक्याची पातळी कायम आहे. २००५ साली देखील बदलापूरला असाच पुराचा वेढा पडला होता. त्यानंतर आता १४ वर्षांनी पुन्हा बदलापूर पाण्याखाली गेल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here