रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची आणि सहाजिकच महिला मतदारांचीही संख्या अधिक आहे. हे प्रमाण सुरुवातीपासून तसेच आहे. मात्र अधिक असलेल्या या महिलांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महिलांना लोकप्रतिनिधी म्हणून पुरेशी संधी दिली जात नाही, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. यावेळची निवडणूकही त्याला अपवाद नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या नेहमीच अधिक असते. रोजीरोटीसाठी पुरुष मंडळी मुंबई-पुण्यामध्ये जातात. त्यामुळे गावी महिलाच राहतात, असे त्याचे एक कारण सांगितले जाते. मात्र जिल्ह्यात विणले गेलेले बचत गटांचे जाळे आणि शेतीची धुरा महिलाच सांभाळत असल्याचे लक्षात घेतले, तर जिल्ह्यातील महिला सक्षम आहेत, हेही वेगळे सांगण्याची गरज नाही.
असे असले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी असलेल्या आरक्षणाचा अपवाद वगळला तर लोकप्रतिनिधी म्हणून महिलांना पुरुषांकडून संधी नाकारली जाते. जिल्ह्यात शारदा मुखर्जी या एकमेव महिला खासदार आतापर्यंत होऊन गेल्या. कुसुमताई अभ्यंकर आणि मामी भुवड या दोघीच महिला आमदार रत्नागिरी जिल्ह्यातून निवडून गेल्या आहेतय जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची संख्या सुरुवातीला नऊ होती. त्यानंतर ती सात झाली आणि दहा वर्षांपूर्वी झालेल्या मतदारसंघांच्या फेररचनेत मतदारसंघांची संख्या आता पाच एवढी मर्यादित आहे. महिलांच्या संख्येमध्ये मात्र बदल झालेला नाही.
यावेळची स्थिती लक्षात घेतली तरी जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या १३ लाख दहा हजार ५५५ इतकी आहे. त्यामध्ये सहा लाख २७ हजार ७९३ पुरुष मतदार आहेत, तर महिला मतदारांची संख्या त्याहून ५४ हजार ९५९ एवढी अधिक आहे. पाच मतदारसंघांमध्ये मिळून यावेळी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यामध्ये एकाही महिलेला या प्रमुख पक्षांनी स्थान दिलेले नाही. दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये सुवर्ण सुनील पाटील या एकमेव महिलेने उमेदवारी अर्ज दाखल केला असून ती निवडणुकीच्या रिंगणात आहे.ज्या जिल्ह्यात महिला बहुसंख्येने आहेत, आर्थिक व्यवहार ज्या महिलांवर अवलंबून आहेत, शेती ज्या महिलांमुळे टिकून आहे, त्या जिल्ह्यात विधानसभेसाठी मात्र महिलांना प्रतिनिधित्व दिले जात नाही. सक्षमीकरणाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या जिल्ह्याला विचार करायला लावणारी ही बाब आहे.
