दापोलीत सारख्याच नावाच्या सहा उमेदवारांमुळे संभ्रम

0

सारखीच नावे असलेल्या सहा उमेदवारांमुळे दापोली मतदारसंघातील मतदारांचा संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्याचा फटका उमेदवारांनाही बसू शकतो, हे उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात संजय कदम नावाचे चार, तर योगेश कदम नावाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीत खरी लढत तुल्यबळ उमेदवारांमध्ये असते. मात्र नावात साम्य असलेले अनेक उमेदवार असतील, तर मतदार गोंधळून जातात. नावात साम्य असलेल्या उमेदवाराला मतदान करतात. त्यामुळे काही मते त्यांच्या पारड्यात पडतात. त्याचा परिणाम प्रमुख उमेदवारांवरही होत असतो.

चिन्हांकडे न पाहता नावाप्रमाणे मतदान केले, तर हा गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा युक्त्या निवडणुकीत वापरल्या जातात. दापोली विधानसभा मतदारसंघात तसे झाले आहे.

या मतदारसंघात प्रमुख लढत शिवसेनेचे योगेश रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे संजय वसंत कदम यांच्यात आहे. परंतु संजय कदम यांच्या नावात साधर्म्य असलेले आणखी तीन अपक्ष उमेदवार या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे आहेत. संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम आणि संजय संभाजी कदम अशी त्यांची नावे आहेत. यामुळे या मतदारसंघात संजय कदम नावाचे चार उमेदवार झाले आहेत. शिवसेनेचे योगेश रामदास कदम यांच्याव्यतिरिक्त योगेश दीपक कदम या नावाचा अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here