ठाणे : मुंबई उपनगरातील बदलापूर परिसरात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने बदलापूर रेल्वे स्थानक येथे पाणी भरल्याने लोकल सेवा विस्कळीत होऊन मुंबई ते अंबरनाथ पर्यंतच लोकल सुरू आहे. यामध्ये ट्रॅकवर पाणी असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस सामटोली जवळ उभी आहे. यामुळे बाहेर पंधरा फुटापर्यंत पाणी आहे. रेल्वेच्या डब्यात सुमारे ७०० प्रवासी अडकून पडले आहेत. तब्बल बारा तासांपासून प्रवासी अडकून पडले असून, पाणी, खाण्याकरिता काहीच नसल्याने प्रवासी घाबरले आहेत. रेल्वे प्रशासनाने तातडीची मदत मागितल्यानंतर मुंबईतून एनडीआरएफचे ४० जणांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांच्या सोबत ८ बोटी आहेत. मात्र, रस्त्यांवरही पाणी असल्यानं मदतीत अडथळे येत आहेत. पाण्याच्या पातळीत उत्तरोत्तर वाढ होत असून पाणी गाडीत शिरण्याची शक्यता आहे. पाण्याबरोबर साप गाडीत शिरण्याच्या शक्यतेनं प्रवासी घाबरले आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टर च्या साहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न होणार असल्याची दाट शक्यता आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेस मधील प्रवाशांनी रेल्वेच्या डब्यातून बाहेर पडू नये. त्याना सुरक्षित बाहेर काढण्याकरिता रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले असल्याचे मध्य रेल्वेचे वरीष्ठ माहिती व जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यानी सांगितले.
