लांजा येथील मटका धंद्यावर पोलिसांची कारवाई

0

गावठी दारूविक्रीबरोबरच अवैधरित्या जुगार व मटका व्यवसाय करणा-यांच्या विरोधात पोलीसांनी कारवाईचे सुत्र हाती घेतले आहे. यानुसार लांजा शहरात पेट्रोलपंपाशेजारील बंद असलेल्या दुकान गाळयामध्ये मेनरतन मुंबई नावाने मटका व्यवसाय करणा-या लांजा शेटयेवाडी येथील महेश नारायण शेटये (वय ४७) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये सापडलेली रोख रक्कम व साहित्य मिळूण १७३२ रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

लांजा पोलीसांनी बुधवारी रात्रौ ही कारवाई केली. लांजा शहरातील पेट्रोलपंपाशेजारील बंद असलेल्या दुकानगाळयामध्ये शेटये नामक व्यक्ती मटका व्यवसाय करीत असल्याची खबर लांजा पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी बुधवारी सायंकाळी या बंद असलेल्या दुकानगाळयावर छापा टाकला असता त्याठिकाणी महेश नारायण शेटये ही व्यक्ती मुंबई मेनरतन या नावाने मटका व्यवसाय करीत असल्याचे आढळूण आले. यावेळी त्याच्याकडे मटका अंक छापलेले गुलाबी रंगाचे पावती पुस्तक, मेनरतन मुंबई नावाचे मटका जुगाराचे अंक, रोख रक्कम १७२० रूपये , पेन, स्टॅपलर असा १७३२ रूपयांचा मुद्देमाल पोलीसांना आढळूण आला. तो जप्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महेश शेटये याला रात्रौ १०.३७ वाजता अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरगावकर हे करीत आहेत. दरम्यान, पोलीसांच्या या मटकाविरोधातील कारवाईमुळे असा व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. तर शहरातील नागरिकांतून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here