बिचुकलेंची संपत्ती पाहून व्हाल थक्क!, पत्नीची मालमत्ताही चर्चेचा विषय

0

कायम चर्चेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. बिचुकले यांनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. बिचुकले यांनी आपली एकूण संपत्ती केवळ ७८ हजार ५०३ रुपये इतकी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी अलंकृता यांच्या नावावर बिचुकलेंपेक्षा चौपटीहून अधिक असल्याचे दिसत आहे. अलंकृता यांच्या नावावर ३ लाख ६६ हजार ८१८ रुपये आहेत असं बिचुकलेंनी स्पष्ट केलं आहे.

HTML tutorial

वरळीतून अपक्ष निवडणूक लढवणारे बिचुकले यांनी आपल्याकडे दागिने, गाडी, पॉलिसी असं काहीही नसल्याचं म्हटलं आहे. ७५ हजारांची रोख रक्कम आपल्याकडे असून याशिवाय तीन बँकांमध्ये ३ हजार ५०३ रुपये आहेत असं बिचुकलेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आपली एकूण संपत्ती ७८ हजार ५०३ इतकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पत्नी अलंकृता यांच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम, बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण ३ लाख २६ हजार ८१८ रुपयांची मालमत्ता आहे असं या प्रतिज्ञापत्रात बिचुकलेंनी स्पष्ट केलं आहे. अलंकृता यांच्या नावावर ८० हजारांची दुचाकी आणि ९० हजार किंमतीचे तीन तोळे सोने आहे.

विशेष म्हणजे बिचुकले दांपत्याच्या नावावर एकही स्थावर मालमत्ता नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अभिजित बिचुकले यांनी मागील पाच वर्षांमध्ये एकदाही आयकर भरलेला नाही. तर पत्नी अलंकृताने २०१५-१६ मध्ये ४६ हजार ९९४ रुपयांचा आयकर भरला आहे. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ९० हजार रुपये, २०१७-१८ मध्ये ७५ हजार रुपये, २०१८-१९ मध्ये एक लाख ५ हजार ५९५ रुपये तर २०१९-२० मध्ये ६९ हजार ३६० रुपये आयकर अलंकृता यांनी भरला आहे. याशिवाय साताऱ्यामध्ये आपल्याविरोधात एक खटला सुरु असल्याचेही बिचुकलेंनी या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here