मुलाच्या विजयासाठी रामदास कदम दापोली मतदारसंघात तळ ठोकून

0

मंडणगड-दापोली-खेड  मतदारसंघात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे  तर आ. संजय कदम यांचे अस्तित्व सिद्ध होणार आहे. त्यामुळे दापोलीच्या गडावर वर्चस्व सिद्ध कोण करणार यांची उत्सुकता लागली आहे.

माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा पराभव करून मिळवलेली सत्ता हातची जाऊ नये म्हणून संजय कदम झटत आहेत. दापोलीत 25 वर्ष असलेली शिवसेनेची सत्ता परत मिळावी म्हणून रामदास कदम हे मागील चार वर्ष मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

सूर्यकांत दळवी यांच्या पराभवांतर दापोली मतदारसंघात रामदास कदम यांनी योगेश कदम यांच्या विजयासाठी पाय रोवलाआणि मतदारसंघात शिवसेनेची पक्कड घट्ट केली. त्यामुळे दापोलीतील राष्ट्रवादीचे आ. संजय कदम यांनी प्रस्थापित केलेले राष्ट्रवादीचे साम्राज्य काहीसे खिळखिळीत झाले. हे साम्राज्य टिकविण्यासाठी संजय कदम यांनी सेना विरोधी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची साथ घेतली आणि सेना विरोधी राजकीय पक्षांना जवळ करून राष्ट्रवादीची घडी बसविली.

मात्र सेनेतील नाराज माजी आ. दळवी यांचे राजकीय साम्राज्य डळमळीत झाले. याचा फायदा मात्र शिवसेनेला झाला. या नंतर मतदारसंघात अधिक प्राबल्य कुणाचे यासाठी दोन्ही पक्षांकडुन दापोलीत उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी जोरदार शक्ती प्रदर्शन झाले.शक्ती प्रदर्शन करून दोन्ही उमेदवारांनी विजयाची गणिते बांधली. मात्र मीच हमखास निवडून येईन याबाबत आज तरी शाश्वत गणित कुणीही मांडलेले नाही.

गत लोकसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना अठरा हजारांचे मताधिक्य मिळाले. यावेळी कुणबी फॅक्टर जोरात असताना देखील आ. संजय कदम यांनी आपला मतदार राष्ट्रवादीशी बांधून घेतला. यामुळे मताधिक्क्यात वाढ झाली नाही. परंतु विधानसभेमध्ये या मताधिक्याचा विचार होणार नाही.

संजय कदम हे रामदास कदम यांच्या मुशीतूनच आलेले नेतृत्व आहे.  सूर्यकांत दळवी आणि संजय कदम यांचा जि.प.अध्यक्ष पदावरून झालेल्या वादात संजय कदम  यांनी सेनेतून  फारकत घेतली आणि सूर्यकांत दळवी यांचा 25 वर्षाचा गड जिंकला. मात्र दळवी यांच्या पराभवानंतर संजय कदम यांना राष्ट्रवादी पक्षात क्रियाशील कार्यकर्ते लाभले नाहीत. त्यामुळे संजय कदम असा एकला चलोरे  करत पक्षाचा गाढा अनेकदा हाकत आहेत.

या उलट रामदास कदम यांनी दळवी विरोधी सेनेतील कार्यकर्त्यांची भक्कम फळी अलगद उचलून योगेश कदम यांच्या नेतृत्वला जोडली. दळवी विरोधातील फळीला तालुक्यातील सामान्य शिवसैनिकांनी अनेक वेळा कडाडून विरोध केला. आपल्या मुलाच्या विजयासाठी ना. कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्या विरोधात विद्यमान आ. संजय कदम अस्तित्त्वासाठी झगडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here