रत्नागिरी – कोणी काही म्हणो, युतीचे धोरण ठरले आहे आणि शिवसेनेचे तर आहेच. जिथे जनतेचा विरोध आहे, तेथे प्रकल्प लादायचा नाही. त्यामुळे वाटद एमआयीडीसीला स्थानिकांचा विरोध असले तर ती होऊ देणार नाही. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे,अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीनिमित्त युतीचे उमेदवार उदय सामंत यांच्या प्रचारासाठी मठ येथील मेळाव्याला ते आले होते. यावेळी पाली येथील हेलिपॅडजवळ त्यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपचे आमदार आणि जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद लाड यांनी गुरुवारी (ता. 10) पत्रकार परिषद घेऊन वाटद एमआयडीसी होणार आहे.
काही असंतुष्ट लोक त्याला विरोध करीत आहेत. आम्ही बैठक घेऊन त्यांचा गैरसमज दूर करू, असे स्पष्ट केले होते. त्याआधी शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी स्थानिकांना शब्द दिला आहे. वाटद एमआयडीसीला स्थगिती मिळेल. जर एमआयीडीसी झाली, तर पुन्हा वाटद गटामध्ये मते मागायला येणार नाही, असे स्पष्ट केले होते. युती म्हणून दोन्ही बाजूंनी होणारी वक्तव्य स्थानिकांना संभ्रमात टाकणारी होती.
उद्योगमंत्री सुभाष देसाई याबाबत म्हणाले, सेनेचे धोरण ठरले आहे, जनतेवर कोणताही प्रकल्प लादणार नाही. विरोध असेल तर वाटद एमआयडीसी होऊ देणार नाही. यापूर्वी शिवसेनेने घेतलेल्या निर्णयांना विरोध झाला तरी सेना आपल्या भूमिकेवर ठाम होती आणि यापुढेही राहील.
नाणार पुन्हा होणार नाही – सुभाष देसाई
नाणार येथील रद्द झालेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प लोकांची मागणी असेल तर पुन्हा विचार होईल, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले. याला उत्तर देताना सुभाष देसाई म्हणाले, नाणार प्रकल्प गेला आहे. जे गेले ते पुन्हा होणार नाही. आता ते शक्य नाही.
