देवरूख (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील विविध भागात रानटी प्राण्यांकडून शेतीची नासधूस सुरू असल्याचे चित्र आहे. कापणी योग्य झालेली भातशेतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधीक आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. यातून वर्षाला पुरेल इतके उत्पादन घेतले जाते. यासाठी अहोरात्र कष्ट शेतकरी उपसात. यावर्षी लावलेली भातशेती कापण्यासाठी योग्य झालेली आहे. मात्र गवा रेडे, डुक्कर यांच्याकडून शेतीचे नुकसान होत आहे असल्याची ओरड फणसवणे, बेलारी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमधून होत आहे. रानटी प्राणी कळपाने येऊन भातशेतीत घुसत असल्याचे प्रकार घडत आहेत. रानटी प्राणी यातच गेली चार दिवस वरूणराजा हजेरी लावत असल्याने भातशेती आडवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
