रत्नागिरी (वार्ताहर): कोचीवली अमृतसर एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात आल्यानंतर प्रवासी महिलेची पर्स लांबविल्या प्रकरणी अज्ञात तरुणाविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पद्मजा गोपीनाथ नायर या महिलेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालसोपारा येथील पद्मजा नावर (वय ५४) वा ८ ऑक्टोबर रोजी कोचीवली अमृतसर रेल्वे गाडीने प्रवास करित होत्या. गाडी ३.४५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकात आली असताना सुमारे २० वर्षीय तरुणाने त्यांच्या डोक्याखालील पर्स लांबविली. त्यामध्ये ५१ हजार रु. किंमतीचा मोबाईल, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, रोख ४ हजार ८०० रुपयांचा समावेश होता. पद्मजा नायर यांनी चोरीबाबत मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा गुन्हा शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास पो.ना.सुर्वे करीत आहेत.
