सावंतवाडी : नारायण राणे हे दुसऱ्यांचे पक्ष विसर्जित करण्याची भाषा यापूर्वी करत होते. प्रथम मी राष्ट्रवादीत पक्षामध्ये असताना राष्ट्रवादी विसर्जित करण्याची भाषा नंतर शिवसेनेमध्ये आल्यानंतर शिवसेनेला विसर्जित करण्याची भाषा करत होते. आता शिवसेनेने इतका त्यांना धोबीपछाड दिला आहे की त्यांना आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विसर्जित करावा लागत आहे. पक्ष विसर्जित होईलच त्यानंतर राणे यांचेही विसर्जन होईल येत्या पाच ते सहा महिन्यात भाजपातून नारायण राणे हकालपट्टी करतील असे भाकीत शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
ते आपल्या श्रीधर अपार्टमेंट संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत संदेश पारकर, शैलेश परब, डॉ. जयेंद्र परुळेकर वसंत उर्फ अण्णा केसरकर उमाकांत वारंग आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, की राणे यांचा भाजपप्रवेश हा विकासाच्या मुद्द्यावर झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य सूचक आहे. राणेंनी कटुता संपवावी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शिवसेनेला संपविण्याची भाषा राणे यांंनी केली होती. त्यामुळेे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते त्यांनी केले तर बरेच होईल. वेटिंगमध्ये राहिल्यामुळे ते काहीकाळ यातून वाचू शकतील.
वेंगुर्ले राड्यामध्ये आलेली माणसेही राणेंसोबत आली होती. ते ज्या ठिकाणी बोट दाखवतील त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बेसुमार दिसेल त्या गाड्यांची मोटरसायकलची तोडफोड केली. या राड्यातील आरोपींना सात वर्षांची शिक्षाा झाली असून राजन तेली यांनी जेआर डी हॉटेल फोडले त्याला राणे यांचा इशारा होता असा गौप्यस्फोटही केसरकर यांनी केला.
