टोकियो : भारताचा बॅडमिंटन खेळाडू बी. साईप्रणितने जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र, स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. प्रणितने उपांत्यपूर्व सामन्यात इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तोला 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-12, 21-15 असे सरळ गेममध्ये पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याला जपानच्या अग्रमानांकित केंतो मोमोटाचा सामना करावा लागेल. बिनमानांकित भारतीय खेळाडू असलेल्या प्रणितने पहिला गेम सुरुवातीला 1-1 असा बरोबरीत आणल्यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता इंडोनेशियाच्या या खेळाडूला पुनरागमन करणे जमलेच नाही. दुसर्या गेममध्येदेखील प्रणितने आपला फॉर्म कायम ठेवत विजय निश्चित केला. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूला सरळ गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सिंधूला जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या यामागुचीने 21-18, 21-15 असे नमविले. सिंधू पहिल्या गेममध्ये 11-7 अशी आघाडीवर होती; पण यामागुचीने पुनरागमन करीत गेम 21-18 असा जिंकला.दुसर्या गेममध्येदेखील यामागुचीने सिंधूला कोणतीच संधी न देता गेम 21-15 असा जिंकला. पुरुष दुहेरीत जपानच्या दुसर्या मानांकित ताकेशी कामुरा व केईगो सोनोडा जोडीने भारताच्या सात्विक साईराज रनकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीला 21-19, 21-18 असे पराभूत केले.
