‘पोलादी माणसे’ मधून उलगडला उद्योजकांचा संघर्षमय प्रवास- दीपक साळवी

0

रत्नागिरी
स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीकारकांचे ध्येय स्वातंत्र्य मिळवणे हे होते. त्यासाठी मार्ग वेगवेगळे वापरले गेले. स्वातंत्र्यानंतर हे ध्येय हळुहळू बदलत गेले. आज भारतात उद्योजक, निर्यातदार वाढले पाहिजेत. त्याकरिता तरुणांनी उद्योजक बनले पाहिजे. पोलादी माणसे- रत्नागिरी जिल्हा या पुस्तकातून असे काही ज्येष्ठ उद्योजकांचा संघर्षमय प्रवास मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक निश्‍चितच वाचनीय व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रतिथयश बांधकाम उद्योजक दीपक साळवी यांनी अध्यक्षस्थानावरून केले.
पोलादी माणसे रत्नागिरी जिल्हा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम तीन तास रंगला. या वेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, पोलाद उद्यमिता प्रतिष्ठानचे सुनील गोयल, लेखक, मुक्त पत्रकार दत्ता जोशी उपस्थित होते. सुरवातीला चैतन्य पाठक यांनी उद्यमगीत सादर केले. या पुस्तकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 24 उद्योजक, व्यक्ती, संस्थांची माहिती आणि त्यांचा संघर्षमय प्रवास मांडण्यात आला आहे. या सर्व मान्यवरांचा सत्कार सुनील गोयल यांनी केला.
सुनील गोयल यांनी सांगितले, की भारत देश जगाला शेकडो वर्षे अनेक प्रकारच्या वस्तू निर्यात करत होता. त्यामुळेच भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. परंतु शत्रूने व इंग्रजांनी भारताला लुटले, इथली संपत्ती परदेशात नेली. भारतीयांच्या डीएनएमध्ये उद्योगीपणा आहे, पण आपण हे विसरलो आहोत. आजच्या नवीन पिढीला उद्योग कसा करावा आणि एखादी वस्तू बनवून ती निर्यात कशी करावी, हे पुन्हा एकदा नव्याने शिकवण्याची वेळ आली आली. त्याकरिता जगाचा भूगोल, इतिहास शिकला पाहिजे. इंटरनेटचा उपयोग करून आपले ग्राहक शोधले पाहिजेत. पोलादी माणसे या पुस्तकातून असे अनेक उद्योजक आपल्या भेटीला आणले आहेत. वाईट माणसांची यादी लगेच मिळते पण चांगल्या माणसांची यादी शोधावी लागते. चांगल्या माणसांची माहिती मिळण्याकरिताच ही पुस्तकांची मालिका 23 जिल्ह्यात काढली. अन्य जिल्ह्यांतही काढणार आहोत.
अ‍ॅड. दीपक पटवर्धन म्हणाले की, उद्यमिता प्रतिष्ठानने कोणत्याही अपेक्षेशिवाय, शून्यातून उद्योगभरारी घेणार्‍या, सचोटीने व्यवसाय करणार्‍या व चारित्र्यवान उद्योजकांच्या मुलाखतींचे पुस्तक प्रकाशित करून तरुणांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे. या पुस्तक वाचनातून तरुण उद्योजक निर्माण होतील.
लेखक दत्ता जोशी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाल्यामुळे मी माणसे जोडायला शिकलो. अनेकांना भेटलो आणि विनम्र झालो. प्रत्येक जिल्ह्यात उद्योजकांना भेटण्याची संधी मिळते. या सार्‍यांनी शून्यातून उद्योग निर्माण केले आहेत. त्यांचा आदर्श युवकांनी घ्यावा.

HTML tutorial

मुलाखतीतून कळला प्रवास

कोकणातील पहिल्या बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांटचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, महालक्ष्मी फूड प्रॉडक्टचे मालक योगेश सरपोतदार आणि कृपा हेअर टॉनिकचे निर्माते राजन दळी यांची प्रकट मुलाखत दत्ता जोशी यांनी सुरेख घेतली. हे उद्योजक उद्योगामध्ये कशा पद्धतीने आले, त्यांना संघर्ष कसा करावा लागला आणि आज ते यशोशिखरावर कसे पोहोचले याचे सविस्तर विवेचन मुलाखतीतून ऐकायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here