जागतिक अन्न दिनानिमित्त “फिश ओ फिश सीफूड नुट्रीशनल पाककृती स्पर्धा”

0

रत्नागिरी : युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संस्थेकडून ( FAO ) दरवर्षी १६ ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. यासाठी दरवर्षी एक थीम ठरवली जाते. यावर्षीची थीम आहे “अचिंविंग झिरो हंगर इज नॉट अबाउट अड्रेसिंग हंगर” म्हणजेच भुकेल्यांना अन्न पुरवणे म्हणजे भूक मिटवणे नाही तर सकस अन्न पुरवून सशक्त पिढी निर्माण करणे. यासाठी सर्वाना परवडू शकेल असे आरोग्यदायक आणि पौष्टिक अन्न स्रोत निर्माण करणे आणि ते सगळ्यांना सहज मिळतील याची काळजी घेणे हा यावर्षीचा ऍक्शन प्लॅन अन्न आणि कृषी संस्थेने ठरवला आहे. याच ऍक्शन प्लॅननुसार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी यांनी आपल्या समुद्रसंपत्तीला हेल्थ फूडचा दर्जा देत, या आगळ्यावेगळ्या आणि मत्स्यप्रेमींना सदैव आकर्षित करणाऱ्या कोकणातल्या सीफूडला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक खास पाककती स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही “फिश ओ फिश : सीफूड नुट्रीशनल पाककृती स्पर्धा” १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता हॉटेल सी फॅन, मांडवी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. “फिश ओ फिश न्यूट्री सॅलड”, “फिश ओ फिश न्यूट्री स्नॅक” आणि “फिश ओ फिश न्यूट्री मेन डिश” अशा तीन खाद्यप्रकारांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी कोणत्याही प्रकारची पाककृती स्पर्धकांनी घरी तयार करून , ती हॉटेल सी फॅन येथे दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत मांडावयाची आहे . या सोबत A४ कागदावर बनवलेल्या पाककृतीचे साहित्य , कृती आणि त्यातील पौष्टिकता याबद्दल माहिती लिहून द्यायचे आहे. या स्पर्धेसाठी वैयक्तिक स्पर्धकांना प्रत्येक पाककृतीसाठी रु. १०० आणि कॉर्पोरेट किंवा संस्थांतर्फे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना रु. २५० असे प्रवेश मूल्य ठेवण्यात आले आहे. या खाद्यप्रकारात मासे, कोळंबी, खेकडा, शेवंड, मुळ्ये, कालव, काकई किंवा म्हाकूळ यांचा ७० – ८० टक्के वाटा असावा. पाककृती मांडण्यासाठी स्पर्धकांनी आपले साहित्य आणावे असे आयोजकांनी सुचविले आहे. मांडलेल्या खाद्यप्रकारांचे तज्ञ परीक्षकांकडून सायंकाळी ५ ते ६ दरम्यान परीक्षण करून, हे प्रदर्शन सर्वांसाठी ६ ते ७ वाजेपर्य खुले केले जाईल. या स्पर्धेसाठी तिन्ही खाद्य प्रकारात, प्रथम रु. १००० / -, व्दितीय रु. ५०० / – आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ याच ठिकाणी संध्याकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान होईल. सर्व यशस्वी स्पर्धकांना मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान आणि सूक्ष्म जीवशास्त्र विभागाने तयार केलेले मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ निर्मिती हे पाककृती पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका, प्रवेश मूल्य भरून मत्स्य महाविद्यालय, शिरगांव येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत उपलब्ध असतील. प्रवेशिका भरून आपली नोंदणी केलेल्यांनाच या स्पर्धेत भाग घेता येईल. अधिक माहितीसाठी श्री. साईप्रसाद सावंत ( ९३०७८०७०३१ ) किंवा डॉ. स्वप्नजा मोहिते ( ९५४५०३०६४२ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here