रत्नागिरी – जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने 2019-20 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी कलेक्टरेट उपडाकघराच्या पोस्टमास्तर मनिषा झगडे यांचा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 1 ऑक्टोबर रोजी पणजी येथील मॅक्वेज हॉल येथे हा सोहळा झाला. प्रदीर्घ कालावधीनंतर रत्नागिरी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा झालेला हा सत्कार अत्यंत कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे.
श्रीमती झगडे यांनी या आर्थिक वर्षात केवळ 5 महिन्यात एक कोटी सात लाखाच्या डाक विम्याचा व्यवसाय केला. तसेच 1,10,272 रुपयांचा प्रिमियम देखील जमा केला. अल्पकालावाधीत श्रीमती झगडे यांनी दिलेले उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात पूर्ण केले. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या टपाल कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात जागतिक टपाल दिनी त्यांच्या या कामाची दखल घेऊन गोवा पोस्टल रिजनने त्यांचा सत्कार केला.
रत्नागिरी विभागातील डाकघर अधिक्षक श्री. ए. बी. कोड्डा यांच्या प्रोत्साहनामुळे तसेच वरिष्ठ, सहकारी, विमा धारक यांच्या सहकार्यामुळेच आपण यशस्वी होऊ शकलो अशी भावना व्यक्त करत यापुढील उद्दीष्ट ही अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा मानस श्रीमती झगडे यांनी व्यक्त केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ,पोस्ट मास्टर जनरल गोवा रिजन विनोदकुमार वर्मा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. श्रीमती झगडे यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
