रत्नागिरी – नितेश राणे मोठ्या भावाला वडिलांप्रमाणे इज्जत देतो. आमचे कुठल्याही विषयामध्ये कदाचित आमचे दोघांची मते वेगळी असू शकतात. तसेच मी मरेल त्याच दिवशी नितेशची साथ सोडणार असा खुलासा माजी खासदार निलेश राणे यांनी नितेश राणे यांच्याबद्दल केला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत नितेश राणे यांनी सकारात्मक मत व्यक्त केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी नितेशच्या विषयाशी मी जराही सहमत नसल्याचं ट्विट केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, मला बोलायचे काय होते आणि माध्यमांनी अर्थ काय लावला, असे म्हणत निलेश यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटबाबत खुलासा केला आहे.
21 व्या शतकात असा भाऊ सापडणे हे माझे भाग्य आहे. नितेश राणे मोठ्या भावाला वडिलांप्रमाणे इज्जत देतो. कुठल्याही विषयामध्ये त्याचे एक वेगळे मत असू शकते, माझे एक वेगळे मत असू शकते. मात्र, नितेश आणि माझ्यात कोणताही वाद किंवा मतभेद नाहीत. निलेश राणे मरेल त्याच वेळी नितेशची साथ सोडेल असे निलेश यांनी म्हटले आहे. शिवसेनेबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले, मागच्या 15 वर्षांत आमच्याबरोबर जे काही घडले आहे ते मी तरी सहज विसरू शकत नाही. आम्ही नाही तर शिवसेनाच प्रत्येक वादाला सुरूवात करते. परवाच सुभाष देसाई म्हणाले, आमचा व्यक्तीला विरोध आहे. जर तुम्ही आमच्या कुटुंबाचा इतका विरोध करत असाल तर आम्ही तुमची आरती ओवाळू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले, फक्त बाळासाहेबांनाच त्रास झाला का ? आमच्या साहेबांना त्रास झाला नाही का? सुरुवात त्यांनी केली तर आम्हाला कुठेतरी आमची बाजू मांडावीच लागणार आहे आणि राणे साहेबांवर टीका केली तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ आणि त्यामुळे ज्या दिवशी शिवसेना माघार घेईल त्या दिवशी आम्हीही माघार घेऊ, असे निलेश यांनी म्हटले आहे.
