खेड । वृत्तपत्र कार्यालयात शिरून कर्मचाऱ्यांना दमदाटी शिवीगाळ तसेच सार्वजनिक ठिकाणी खेड मधील २ पत्रकारांवर जीवघेणा हल्ला त्याच बरोबर २००९ पासून शहरात वारंवार गुन्हे करत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अवैधरित्या मटका व्यावसायिकासह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १० जणांवर २ वर्षासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी रविवारी जिल्हा हद्दपारीचे प्रस्ताव पारित केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षका सौ. सुवर्णा पत्की यांनी दिली.
यातील प्रमुख म्होरक्या असलेला दिनकर उर्फ बारक्या नागनाथ लोहार याच्यासह अजय विठोबा चव्हाण, सुरेश प्रकाश लोहार, प्रभाकर नागनाथ लोहार, बाळाजी रामा लोहार, माणिक नागनाथ लोहार, माणिक नागनाथ लोहार, अनिकेत अनंत खेडेकर , मोहन शांताराम लोहार, नागनाथ नारायण लोहार, अमोल प्रकाश लोहार अशी हद्दपार करण्यात आलेल्या त्या १० जणांची नावे आहेत.
खेड शहरात संघटीत गुन्ह्रेगारी करून २००९ पासून वरील १० जण कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करत होत्रे . तसेच ३ जून रोजी एका वृत्त पत्रात अवैध मटका जुगाराचे वृत्त प्रसिद्ध झाल्या नंतर त्या कार्यालयात शिरून पत्रकार व कर्मचर्यांना दमदाटी केली जात होती व त्याच सांयकाळी स्थानिक वृत्तपत्राच्या २ पत्रकारांवर जीव घेणा हल्ला करत त्यांना जखमी केल्याचा गंभीर प्रकार केला होता.
दरम्यान, या प्रकरणात हल्ला करणाऱ्याना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती मात्र पोलिसांनी याबाबत बोटचेपी भूमिका ठेवल्याने जिल्हयातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत २० ते २५ जून या कालावधीत आमरण उपोषणा चा मार्ग पत्करला होता. अखेर उपोषणाच्या ५ व्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कडे पर्यावरण मंत्री रामदास कदम, युवा सेनेचे योगेश कदम यांनी केलेल्या पाठपुराव्या मुळे चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार १० जणांवर दाखल असलेल्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेवून त्यांना जिल्हा हद्दपार करण्यात आले आहे.
अवैध धंद्याबाबत पत्रकारांनी दंड थोपटून केलेल्या उपोषणाला यश आले आहे. हद्दपार करण्यात आलेल्या दिनकर उर्फ बारक्या लोहार याच्या सह अन्य जणांनी उस्मानाबाद या ठिकाणी जाणार असल्याचा लेखी जबाब पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाई बाबत समाधान व्यक्त होत आहे.
