लांजा – मुंबई गोवा महामार्गावर ट्रॅव्हल्स व मोटार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये ओणी येथील व्यापारी ठार झाला आहे. सदाशिव झिमाजी भारती (वय ५० रा.ओणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातामध्ये सदाशिव यांची मुलगी राखी (१९) ही जखमी असून तिच्यावर रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
लांजा शहरानजीक बागेश्री मंदिरा दरम्यान हा अपघात झाला. मोटार (एम.एच.०८ ए.एन २०२३) लांज्याहून ओणीकडे जात होती. भरधाव वेगामुळे मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून लांज्याकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर ही मोटार आदळली. या अपघातामध्ये मोटारीचे नुकसान झाले आहे.
अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले सदाशिव भारती हे ओणीतील व्यापारी आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही होती. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. सदाशिव भारती यांनी तीन महिन्यांपूर्वी मोटार घेतली होती. या गाडीचे सर्व्हिसिंग करण्यासाठी रत्नागिरी येथील शोरूमला ते गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला.
