लांजा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली आठ ते दहा वर्षे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या बी. ए. एम. एस. डॉक्टरांच्या बदली आदेश निघाल्याने गोंधळ उडाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील जास्त रुग्ण दाखल होणार्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्या झाल्याने येथील रुग्णांची परवड होणार आहे. पुरेशा डॉक्टरांअभावी असलेल्या या शासकीय प्रा. आ. केंद्रातील रुग्णसेवेचा मुळातच बोजवारा उडाला असून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या वैद्यकीय सेवेची पुरती हेळसांड होणार आहे. या बदल्यांमुळे ही आरोग्य केंद्र ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली दहा वर्षांपासून कंत्राटी म्हणून कार्यरत असणार्या बीएएमएस डॉक्टरांना कायम सेवेत करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. या दृष्टीने आजवर कार्यरत असलेल्या कंत्राटी डॉक्टरांचे राज्यात रिक्त आणि मागणी असलेल्या ठिकाणी बदली व्हावी, यासाठी स्थायी समावेशन बदली प्रक्रिया करण्यात येत आहे. मुळात या ठिकाणी कार्यरत असलेल्या बी.ए.एम.एस. डॉक्टरांना सोयीच्या ठिकाणी बदली देण्याच्या नावाखाली राज्य शासनाची ही समावेशन प्रक्रिया चुकीची ठरणारी आहे. रत्नागिरी जिल्हयात असे रिक्त पदे दाखविली गेली नसल्याने हा घोळ निर्माण झाला आहे. जि.प.न. या कंत्राटी डॉक्टरांबाबत बेसावधपणा दाखविल्याने ही दुर्दैवी वेळ आली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात कार्यरत असलेले आयुर्वेदिक दवाखाने बंद करून तेथील मंजूर बीएएमएस डॉक्टरांची पदे रद्द करण्याचा ठराव जिल्हा परिषदेने केल्यामुळेच ही वेळ येऊन ठेपली आहे. यामुळेच जि.प.ला मंजूर बीएएमएस डॉक्टरांची पदे दाखविता आली नाहीत. म्हणूनच कंत्राटी डॉक्टर शासनाच्या कायम सेवेत हजर करून घेताना आपल्या जि.प. ला रिक्त मंजूर पदांची मागणीच करता आली नाही. परिणामी जिल्ह्यात आवश्यक असणार्या बीएएमएस डॉक्टरांना जिल्ह्याबाहेर जावे लागण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील डॉ. सचिन पवार यांची किनवली शहापूर ठाणे येथे, लांजा तालुक्यातील भांबेड येथील डॉ. सोमनाथ अंकोलीकर यांची भवानीनगर इस्लामपूर सांगली येथे, चिपळूण तालुक्यातील दादर येथील डॉ. जितेंद्र मोरे यांची रेठरे इस्लामपूर सांगली येथे, राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील डॉ. वहिदा मुजावर यांची तासगाव सांगली येथे, सोलगाव येथील डॉ. मिताली मोडक यांची भुईबावडा वैभववाडी सिंधुदुर्ग येथे, संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील डॉ. अरुण टेकाळे यांची कुंभ्याचीवाडी शाहूवाडी कोल्हापूर येथे तर रत्नागिरी तालुक्यातील खानू येथील डॉ. सुशांत रेवडेकर यांची आरले करवीर -कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. यावर उपाय म्हणून नव्याने एमबीबीएस अथवा बीएएमएस वैद्यकीय अधिकारी नेमण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येईल. मात्र, या प्रक्रियेला नेहमीप्रमाणे दीर्घकाळ लागला तर कोकणासारख्या ग्रामीण भागातील असलेल्या प्रा. आ. केंद्रांना कोणीही वाली उरणार नाही. मुळात एमबीबीएस डॉक्टर रत्नागिरी जिल्ह्यात हजरच होत नसल्याची कायमची खंत आहे. ग्रामीण भागातील या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दोन एम.बी.बी.एस डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र, हे एमबीबीएस डॉक्टर मिळणे अशक्यप्राय गोष्ट ठरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची वानवा आहे. जिल्ह्यातील बहुतांशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. अशातच कार्यरत असणार्या बीएएमएस डॉक्टरांच्या अचानक बदल्या केल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडणार आहे.
