रत्नागिरी येथील जैन बांधव नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. यापूर्वी थंडीच्या हंगामात रस्त्यावर आणि उघड्यावर झोपलेल्या गरीबांसाठी ब्लॅंकेट वाटप करुन त्यांनी आपले सामाजिक योगदान दिले असतांना तहानलेल्यांना पाणी , सार्वजनिक ठिकाणी प्रसाद वाटप यासारख्या महत्वपूर्ण उपक्रमांसोबतच आता रस्त्यावर मोकाट फीरणाऱ्या जनावरांच्या शिंगांना रेडियम लावून रात्रीच्या वेळी घडणाऱ्या गंभीर अपघातांपासून वाहनचालक आणि मोकाट जनावरे या दोघांचीही सुटका केली आहे . जैन युवकांच्या या कौतूकास्पद सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांतर्फे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
रत्नागिरी शहर असो वा आजूबाजूचा परिसर मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ही मोकाट जनावरे रात्रीच्यावेळी अनेकदा काळोखात बसलेल्या ठिकाणी दिसून येत नाहीत. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने त्यांच्यावर जावून आदळतात आणि गंभीर अपघात घडतात. या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी होतात प्रसंगी कायमचे अपंगत्व येणे अथवा जीवही जाण्याची शक्यता असते. रत्नागिरी शहर अथवा आजूबाजूच्या परिसरात यापूर्वी असे प्रसंग घडले आहेत. अशा प्रसंगांची गांभीर्याने दखल घेऊन रत्नागिरी येथील जैन युवकांनी रात्रीच्या वेळी शहर आणि आजूबाजूच्या परिसरात फीरुन मोकाट फीरणाऱ्या जनावरांच्या शिंगांना रेडियम लावण्याचे ठरवले आणि सर्वांनी एकत्र येत आजवर असंख्य मोकाट जनावरांच्या शिंगांना रेडियम लावल्याने आता रात्रीच्या वेळी अशी मोकाट जनावरे खूप दुरुन दिसणे शक्य होत आहे.
मोकाट जनावरांना प्रेमाने जवळ बोलवून , त्यांना केळी अथवा तत्सम पदार्थ खायला घालत त्यांच्या पाठीवरुन प्रेमाने हात फीरवत राहीले तर ती शांत उभी राहतात. या कालावधीत सोबतचे तरुण तोपर्यंत रेडियम लावण्याचा आपला हेतू साध्य करतात. मोकाट जनावरांना त्यांच्या मालकांनी असे बेवारस सोडणे अत्यंत चुकीचे आहे . नगरपरिषद अथवा ग्रामपंचायत यांना याबाबत कारवाई करायला मर्यादा येतात . अशा स्थितीत मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यावर जैन बांधवांनी त्यांच्या शिंगांना रेडियम लावण्याबाबत हाती घेतलेल्या उपक्रमाची आता जिल्हाभरात एक चळवळ बनावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान रत्नागिरी मधील जैन युवकांच्या या उपक्रमाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे .
