गजानन पाटील यांना मातृशोक

0

मालगुंड : कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष, शिवसेनेच्या सहकार सेनेचे जिल्हाप्रमुख, रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा रत्नागिरी पंचायत समितीचे सदस्य गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांच्या आईचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले आहे.
मालगुंड व मालगुंड परिसरात त्या अतिशय मनमोकळ्या स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या. त्यामुळे त्यांच्या सहवासात अनेकजण राहायचे. सर्वांच्या अडीअडचणी मध्ये त्या सर्वांना मदत करण्यासाठी अग्रेसर राहत असत. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांच्या बाबतीत सर्वांच्या मनात अत्यंत आदर होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने पाटील कुटूंबात आणि मालगुंड परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे मुले, मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या दवाखान्यात आजारी असताना स्वतः म्हाडा अध्यक्ष तथा आमदार उदय सामंत, विधानपरिषद सदस्य आमदार प्रसाद लाड, यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि विविध कार्यक्षेत्रातील अनेकांनी पाटील कुटुंबियांना आधार दिला होता. परंतु अनेक उपचारानंतरही त्यांना वाचविण्यात अपयश आले.
यावेळी प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू ढवळे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त रमेश कीर, रत्नागिरी जिल्हा भंडारी समाजाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी सभापती शरद बोरकर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब मयेकर, माजी सभापती प्रकाश साळवी, गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ पाटील, यांच्यासह पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कोकण मराठी साहित्य परिषद आणि गजानन पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील, सर्व कार्यालयातील सर्वच अधिकारी – पदाधिकारी – कर्मचारी यांनी स्वतः उपस्थित राहून तसेच फोनद्वारे गजानन पाटील आणि कुटुंबियांचे सांत्वन करताना या दुःखद प्रसंगी त्यांना धीर दिला.
यांचा दशक्रिया विधी दिनांक २२ ऑक्टोबर वार – मंगळवार आणि बाराव्याचा विधी दिनांक २५ ऑक्टोबर वार – शुक्रवार या दिवशी त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात मालगुंड ता. जि. रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here