रत्नागिरी – राजापूर पोलिस ठाण्यात चालक पदावर कार्यरत असलेल्या तरूण पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी कुवारबाव येथे ही घटना घडली. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसले तरी एका नाजूक विषयातील प्रचंड ताणामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सागर दिलीप जाधव (वय 33, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. तो पोलिस नाईक होता.
या प्रकारानंतर त्याच्या मित्रांसह अनेकांनी घराकडे धाव घेतली. घराच्या हॉलमधील सिलिंग फॅनला नायलॉनच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्यांचा भाऊ संदीप जाधव मुंबईहुन घरी आले; तेव्हा हा धक्कादायक प्रकार पुढे आला.
त्यांनी पोलिसांना तत्काळ खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागर मूळचा कोल्हापूर येथील असून तो रत्नागिरीत स्थायिक झाला होता. कुवारबाव रवींद्रनगर परिसरात त्याने बंगला बांधला होता. सर्वांमध्ये मिळून मिसळून वागण्याचा त्याचा स्वभाव होता. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यातून तीन महिन्यांपूर्वी राजापुरात बदली झाली होती. सुट्टीदिवशी तो रत्नागिरी येत होता. काही दिवसांपूर्वीच सागरचा विवाह झाला होता. त्यामुळे सागरने आत्महत्येचा निर्णय का घेतला हा प्रश्न अनुत्तरित आहे.
पोलिसांनी सांगितले, की कौटुंबिक अडचणीमुळे सागर पत्नीपासून दूर झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तो काहीसा तणावाखाली असल्याची चर्चा आहे. पत्नीला एक अनोळखी व्यक्ती भेटली आणि त्यांच्या संसारात मिठाचा खडा पडला. त्या व्यक्तीने सागरबद्धल दिलेल्या माहितीमुळे पत्नी हादरुनच गेली आणि त्याच्यापासून दुरावल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
त्याची खातरजमा सुरू आहे. सागर यापूर्वी ज्या पोलिस ठाण्यात होता त्याला एका नाजुक विषयाची किनार असल्याची चर्चा आहे. त्यावरून त्याला ब्लॅकमेलिंगही केले जात होते, अशा चर्चेची पोलिस खातरजमा करत आहेत. या सर्व प्रकारामुळे सागर मानसिक तणावाखाली होता. यातुन त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
