आता 500 रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी

0

मुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करुन 4500 रुपयांवरुन आता नव्या सुधारित दरानुसार केवळ 500 रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले. यापूर्वी राज्यशासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे 1200, 980 आणि 700 रुपये असे दर करण्यात आले होते. आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी 500, 600 आणि 800 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून 500 रुपये आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी 600 रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी 800 रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी नमूद केले आहे. आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी 250, 300 आणि 400 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी 350, 450, 550 असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150, 200 आणि 300 असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. या चाचण्यांसाठी आवश्यक साहित्य आणि साधनसामुग्री माफक दरात उपलब्ध होत असल्याने तसेच आयसीएमआरने विविध उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने त्यांची उपलब्धता वाढली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने त्यावरील खर्च देखील कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांना येणारा तपासणी खर्च कमी झाल्याचे नमूद करतानाच राज्यात आयसीएमआर आणि एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ झाल्याने चाचण्यांचे दर कमी होणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:23 AM 01-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here