रत्नागिरी : संगीत नाटकाच्या क्षेत्रात अजरामर कलाकृतींची देणगी देणारे नटवर्य भालचंद्र पेंढारकर, पंडित गोविंदराव पटवर्धन आणि संगीतभूषण पं. राम मराठे या दिग्गज कलाकारांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांच्या संगीत कलाकृती पेश करून त्यांचे वारस मुकुंद मराठे व ज्ञानेश पेढारकर यांनी ‘पाईक परंपरेचे’ ही मैफल सदाबहार रंगवली.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आणि संस्कार भारती रत्नागिरी समितीच्या वतीने हा कार्यक्रम रविवारी शेकडो रसिकांच्या उपस्थितीत वाचनालयाच्या सभागृहात झाला. वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, चंद्रशेखर पटवर्धन, सतीश रानडे व कलाकारांनी दीपप्रज्वलन केले. अॅड. पटवर्धन यांनी कलाकारांचे स्वागत केले. विजय रानडे यांनी सूत्रसंचालन केले.
पं. मराठे व पेंढारकर यांनी व्यवहार व कला यांची सांगड घातली. यश, कीर्ती, मानसन्मान सर्व काही मिळवले पण शेवटपर्यंत ते निर्व्यसनी राहिले, अशी आठवण संवादक श्रीराम केळकर यांनी सांगितली. भालचंद्र पेंढारकरांचा वक्तशीरपणाचा किस्सा ऐकून रसिक भारावले. एकदा दिल्लीमध्ये नाट्यप्रयोग 6 वाजता होणार होता. पंतप्रधान पं. नेहरू बघायला जाणार होते. त्यांना थोडा उशिर होणार होता. मात्र पेंढारकरांनी ठीक 6 वाजताच सुरवात केली. नेहरू पहिल्या अंकानंतर आत गेले आणि कौतुक केले. पेंढारकरांनी सांगितले की, माझे रसिक माझा आदर आहेत. त्यावर नेहरूंनी वेळ पाळणारा कलाकार असल्याने मी पुढचे दोन्ही अंक पाहणार असल्याचे सांगितले.
मुकुंद मराठे यांनी सांगितले की, रामभाऊ हे जोडरागांचे बादशहा होते. त्यांच्याकडून 60 जोड राग कुमार गंधर्व यांनी रेकॉर्ड करून घेतले. एकदा कुमार गंधर्व आजारपणातून उठले आणि पहिल्याच मैफलीस तानपुरा साथीला रामभाऊ बसले. गंधर्वांनी त्यांना तुम्ही नामांकित गायक, तानपुर्यावर कसे, असे विचारले. त्या वेळी रामभाऊ म्हणाले, तू आज गाऊ शकशील की नाही, म्हणून काही व्यक्ती खिल्ली उडवण्याससाठी आले आहेत. तुझं गाणं थांबेल तेव्हा माझे सुरू होईल, अशी आठवण सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
श्री. मराठे 2014 मध्ये रत्नागिरीत आले असता गणेशगुळे येथील श्रीराम व विजय पटवर्धन यांनी आम्ही पं. राम मराठे यांना संगीत नाटक, गायन याबाबतीत खूप मानतो, तुम्ही आमच्याकडे जेवायला या असे सांगितले. त्या वेळी माजघरात देव्हार्यात पं. मराठे यांची प्रतिमा नित्य पूजेसाठी ठेवल्याचे पाहून मुकुंद मराठे यांना खूपच अभिमान वाटला, गहिवरून आले. त्यानंतर मराठे यांनी नवा कार्यक्रम तयार करून त्याचे 50 प्रयोग केले.
मैफलीत मुकुंद मराठे यांनी हिंडोल बहार हे जोडगार सादर केले. रतीहून सुंदर मदन मंजिरी, परब्रह्म निष्काम, निशिदिनी मनी धरला ही पदे सुरेख गायली. पेंढारकर यांनी मधुरानना, झनन, जय जय रमा रमण, मदनाची मंजिरी ही गीते सुरेख गायली. त्यानंतर आई तुझी आठवण येते हे पद तितक्याच तन्मयतेने खुलवून म्हटल्यावर रसिकांच्या डोळ्यातही पाणी दाटले. तबला धनंजय पुराणिक व हेरंब जोगळेकर, हार्मोनियम विलास हर्षे, ऑर्गन वरद सोहनी यांनी केली. आजच्या कार्यक्रमात पं. विश्वनाथ कान्हेरे ऑर्गनसाथ करणार होते. परंतु त्यांच्याऐवजी शिष्य वरद याने साथ केली. त्याच्या वादनात गोविंद पटवर्धन यांची झलक दिसते असे कान्हेरे सांगतात असे सांगून मराठे यांनी कौतुक केले. 10-12 वर्षांचा श्रीरंग जोगळेकर हासुद्धा ऑर्गन उत्तम वाजवतो. त्याचे कौतुक करून मुकुंद मराठे यांनी त्याला तालवाद्य साथीसाठी रंगमंचावर बोलावले.
