रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात सफाईची ठेका घेतलेल्या ठेकेदाराने सफाई कामगारांचा दोन महिन्यांचा पगार न दिल्याने आज सकाळी रुग्णालयातील १८ सफाई कामगार संपावर गेले. अचानकपणे संपावर गेलेल्या कामगारांमुळे जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाला व जिल्हा रुग्णालय प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा राहील. मागील दोन महिन्यांपासून या सफाई कामगारांना पगारच न मिळाल्याने त्यांना अखेर हे पाउल उचलावे लागले. जिल्हा रुग्णालयाने नेमलेल्या ठेकेदाराला मात्र सर्व पैसे वेळेवर दिले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. हे सफाई कामगार अत्यंत तुटपुंज्या पगारावर जिल्हा रुग्णालयात ठेकेदाराकडे कामाला आहेत मात्र तरीदेखील दर महिन्याचा पगार त्यांना वेळेवर मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. ज्या कंपनीला हा ठेका देण्यात आला आहे त्यांनी एकाखाली एक असे अनेक उपठेकेदार नेमल्याने कायद्यानुसार योग्य पगार या कामगारांना मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयातील हे सफाई कामगार संपावर जाताच जिल्हाशल्यचिकित्सक बोल्डे यांनी याची दाखल घेतली असून ते याबात वरिष्ठांना कळवणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे.
