नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरकारी बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांना आता घरबसल्या बँकांच्या विविध सुविधा मिळणार आहेत. ग्राहकांना पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी बँकेत जाण्याची आणि रांगेत ताटकळण्याची गरज पडणार नाही. सरकारी बँकांकडून ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’ ही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेने काही वर्षांपूर्वी ‘डोअरस्टेप बँकिंग सुविधा’ सुरू करण्याचा सल्ला बँकांना दिलेला होता. आता सरकारी बँकांनी तो गांभीर्याने घेतलेला आहे. बँकांनी ही सुविधा ग्राहकांना देण्यासाठी संयुक्तपणे एखादी यंत्रणा सुरू करण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. या यंत्रणेमार्फत सर्वच सरकारी बँकांकडून ही सुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल.
युको बँकेने ‘रिक्वेस्ट ऑफ प्रपोझल’ प्रसिद्ध केले आहे. कॉल सेंटर, वेबसाईट आणि मोबाईल अॅपची सुविधा देणार्या खासगी कंपन्यांना या प्रस्तावातून सर्वच बँकांच्या वतीने युको बँकेने आवाहन केले आहे. बँकांनी नेमलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून एजंटची नियुक्ती करण्यात येईल. हे एजंट दुसर्या टप्प्यात पैसे जमा करणे आणि पैसे काढण्याच्या सुविधेसह विविध डिव्हाईसद्वारे विविध सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देतील. डोअरस्टेप बँकिंग सुविधा सुरुवातीच्या टप्प्यात केवळ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नंतर टप्प्याटप्प्याने ती बँकेच्या सर्वच ग्राहकांना पुरविण्यात येईल. अर्थात, या सेवेसाठी किमान शुल्क अदा करावे लागणार आहे.
