सातारा | आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची साताऱ्यातल्या सैनिकी स्कूलच्या मैदानावर सभा पार पडली. यावेळी उदयनराजेंचं भाषण चालू असताना संभाजी भिडे सभास्थळी आले. पण काही वेळातच संभाजी भिडे सभास्थळापासून निघून गेले.
संभाजी भिडे यांचं आगमन होऊन बराच वेळ झाला तरी त्यांना स्टेजवर आमंत्रित करण्यात आलं नाही किंवा साधी भाषणात त्यांची दखल घेतली नाही. पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू असतानाच भिडे गुरूजी भर सभेतून निघून गेले.
संभाजी भिडे दहा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार करत होते. त्यांना मोदींचा सत्कार करायचा होता. मात्र, सभेच्या ठिकाणी योग्य मान न मिळाल्याने ते अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. दरम्यान, संभाजी भिडे भर सभेतून निघून गेल्याने सभास्थळी या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती.
