‘लोटिस्मा’ वस्तूसंग्रहालयाला मिळाला तोफेचा गोळा

0

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारेलेल्या वस्तू संग्रहालयास नुकताच १ किलो ६८५ ग्रॅम वजनाचा तोफेचा गोळा मिळाला आहे. युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे यांना त्यांच्या विंध्यवासिनी परिसरातील घराच्या जागेत हा तोफेचा गोळा मिळाला. कानडे यांनी हा तोफगोळा वाचनालयाच्या संग्रहालयास दिला आहे.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले हे ‘संग्रहालय’ २४ नोव्हेंबर २०१८ रोजी मूर्तीशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयातील अधिकारी व्यक्तिमत्त्व डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पर्यटक, अभ्यासक, जिज्ञासूंसाठी पाहण्यास खुले केले आहे. भगवान परशुराम यांचे वास्तव्यस्थान, क्रोकोडाईल टुरिझमसाठी प्रसिद्ध ‘ऑफबीट डेस्टीनेशन’ चिपळुणातील हे संग्रहालय कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव आहे. भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षातल्या विविध वस्तूंचा दुर्मीळ ठेवा पाहायला उपलब्ध असलेले पनवेल ते पणजी दरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे. संग्रहालयात चिपळूण परिसरातील अनेक वस्तू पाहायला मिळतात. आता इथल्या युद्धभूमीवरील तोफगोळा मिळालेला आहे. यापूर्वी रामतीर्थ तलाव परिसरात शिवकालीन नाणी मिळाली होती विंध्यवासिनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ही इतिहासकाळात युद्धभूमी होती. या चौकात आदिलशाही सरदार शेख बहादूर यला तत्कालिन राजे बारराव कोळी यांनी ठार केले होते. विंध्यवासिनी ही कोळ्यांची देवता. पुढे याच परिसरात आदिलशाही सरदार शिंदे आणि राजे बारराव कोळी यांच्यात मोठी लढाई होऊन कोळ्यांचा पराभव झाला. राजे बारराव कोळी यांचे कोणतेही निशाण पाहण्यात नसले तरी शहरातील वडनाक्यावर असलेली एकवीरा देवी ही यांची कुलदेवता म्हणून स्थापन झालेली होती. मुकुंद कानडे यांनी संग्रहालयास तोफगोळा भेट दिल्याबद्दल ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्यवाह धनंजय चितळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:17 PM 05-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here