मुंबई | भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई व महाराष्ट्र आज गंभीर संकटात सापडले आहेत. राज्यातील उद्योजकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे, असं वक्तव्य माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केलं आहे. मनमोहन सिंग मुंबई येथे आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी अर्थव्यवस्था, पीएमसी बँक, बेरोजगारी अशा विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देशाची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत पोहोचली आहे. त्यामुळे त्वरीत उपाययोजना करणं आवश्यक बनलं आहे. पाच वर्षात सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात बंद पडले असून यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना युपीए सरकारने मदत केली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आली. मात्र सध्याचे हे सरकार उदासीन आहे. या सरकारमुळे देशाचे भवितव्य अंधारात आहे, असंही ते म्हणाले.
