सिंधुदुर्ग | मुख्यमंत्र्याच्या सभेत नारायणे राणे यांनी जिल्ह्यात विकास झाला नाही असं म्हटलं, पण मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात झालेल्या योजनांचा पाढा वाचत राणेंना तोंडघशी पाडलं. कणकवलीत सभा नारायण राणेंची मात्र चर्चा पालकमंत्री म्हणून माझी झाली, असा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर मतदारसंघात गावभेटी घेत आहेत. यावेळी त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात कुठेच नाही अशी प्रगती साधायची आहे, त्यामुळे मी मंत्री झालो आहे, असं केसरकर नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले आहेत. 80 टक्के समाजकारण हा शिवबंधणाचा हेतू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनातील नवी क्रांती आणायची आहे. त्याच दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असून शेवट पर्यंत समाजकारणच करत राहणार, असंही केसरकर यावेळी म्हणाले. दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार दिपक केसरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारसंघात केसरकरांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम असल्याचं मानलं जातंय.
