रोहे : रायगड जिल्ह्यातील रोह्यातील कुंडलिका नदी तुडूंब भरुन वाहू लागली आहे. नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. काल (शुक्रवार) रात्रीपासून रोह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रोहा अष्टमी पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. रोहा नागोठणे मार्गावरील रहदारी बंद करण्यात आली आहे. दोन्ही पुलांच्या बाजूने पोलिस तैनात करणात आले आहेत. रोहा अष्टमी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील रहदारी बंद करण्यात आली आहे. रोह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. रोहा ते मुंबई पुणे अलिबागकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहा शहरासह ग्रामीण भागात देखील गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
