ब्लादिमिर पुतिन 2036 पर्यंत रशियाच्या सत्तेत कायम

0

मॉस्को : रशियाचे सर्व शक्तिमान नेते आणि राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन आता आणखी दोन टर्म म्हणजे 2036 पर्यंत रशियाच्या अध्यक्षपदी राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. तशा प्रकारच्या सरकारी कागदपत्रावर स्वत: पुतिन यांनी सह्या केल्या आहेत आणि त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 68 वर्षीय पुतिन हे गेली दोन दशकं रशियाची सत्ता उपभोगत आहेत.

रशियाच्या संसदेने तशा प्रकारची घटनादुरुस्ती केल्यानंतर ब्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी या कागदपत्रांवर सह्या केल्या. गेल्या वर्षी रशियात सार्वमत घेण्यात आलं होतं, त्या आधारावर ही निर्णय घेण्यात आल्याचं सरकारी कागदपत्रात सांगण्यात आलं आहे. ब्लादिमिर पुतिन यांचा सध्याचा कार्यकाल हा 2024 साली संपणार आहे. रशियाच्या राज्यघटनेतील नियमानुसार, कोणतीही व्यक्ती रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी दोन पेक्षा जास्त कार्यकाल राहू शकत नाही. पण या आधी ब्लादिमिर पुतिन यांच्यासाठी या नियमात बदल करून घटनादुरुस्ती करण्यात आली होती. आताही तशाच प्रकारची घटनादुरुस्ती करण्यात आली असून त्यानुसार 2024 साली पुतिन यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना पुढचे दोन टर्म, म्हणजे 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहता येणार आहे. ब्लादिमिर पुतिन हे सर्वप्रथम 2000 साली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. त्यानंतर चार वर्षाच्या सलग दोन टर्म सत्तेत राहिल्यानंतर 2008 साली त्यांची जागा मेदवेदेव यांनी घेतली. त्यावेळी मेदवेदेव यांनी पुढच्या राष्ट्राध्यक्षपदाची टर्म सहा वर्षाची करण्यासाठी घटनेत दुरुस्ती केली. यानुसार, 2012 साली पुन्हा पुतिन हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. 2018 साली पुन्हा एकदा, चौथ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर पुतिन राष्ट्राध्यक्ष बनले. पुतिन यांच्या या निर्णयावर रशियातल्या विरोधकांनी सडकून टीका केली आहे. विरोधकांच्या मते, रशियात संपूर्ण हुकूमशाही सुरू असून पुतिन आता ‘लाईफटाईम प्रेसिडेन्ट ‘बनले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:20 PM 06-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here