एसटी फेऱ्या बंद केल्याने लांजातील प्रवाशांची गैरसोय

0

लांजा : गेल्या काही दिवसांपासून लांजा आगाराचा भोंगळ कारभार सुरू आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षे विनाखंड चालणा-या गावागावातील एसटी फे-या अचानक रद्द केल्या जात असून त्याचा फटका हा ग्रामस्थांसह विद्यार्थीवर्गाला बसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अचानकपणे रद्द करण्यात आलेल्या एसटी फे-यांमध्ये कुवे इंदवटी, कुरचूंब-साखरपा, रावारी, कुवे वारेशीवाडी यासारख्या अनेक एसटीफे-यांचा समावेश आहे. त्यातही कुवे-इंदटवटी ही दुपारी २.३० वाजता सोडण्यात येणारी एसटी फेरी गेल्या ४० वर्षांपासून नियमित सुटत आहे. ती सद्यस्थितीत रद्द करून आणि कुवे इंदवटी-वनगुळे अशी एकच फेरी सोडली जात आहे. याचा फटका हा प्रवाशांना बसत आहे.

यामध्ये लांजा येथे येणा-या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या ८० ते ९० इतकी असून त्यात इंदवटी आणि निओशी येथील ग्रामस्थवर्ग यांची भर पडत असल्याने अक्षरश प्रवाशांना कोंबून नेण्याची वेळ येत आहे. दोन एसटी फे-यांतील प्रवासी एकाच गाडीतून सोडण्याच्या आगार प्रशासनाच्या या अचाट पराक्रमामुळे कुवे, इंदवटी, निओशी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून पुर्वीप्रमाणे एसटीफेरी सुरू न केल्यास प्रसंगी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here